नागपुरात हुंड्यासाठी मोडले लग्न : व्यापाऱ्यासह तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:18 PM2018-01-16T23:18:06+5:302018-01-16T23:22:46+5:30
हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या एका व्यापारी व त्याच्या कुटुंबीयाच्या विरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये आकाश वाट, त्याची आई संध्या वाट, बहीण मेघा कारेमोरे, जावई नरेंद्र कारेमोरे यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या एका व्यापारी व त्याच्या कुटुंबीयाच्या विरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये आकाश वाट, त्याची आई संध्या वाट, बहीण मेघा कारेमोरे, जावई नरेंद्र कारेमोरे यांचा समावेश आहे.
तक्रारकर्ती युवती गणेशपेठ येथील रहिवासी असून, ती इंजिनीअर आहे. युवतीच्या कुटुंबीयांनी एका नातेवाईकाच्या माध्यमातून मे २०१७ मध्ये आकाश याच्या घरच्याशी संपर्क केला. दोन्ही कुटुंबाच्या चर्चेनंतर लग्न ठरले. युवतीचे वडील टेलरचे काम करतात. तिच्या कुटुंबात आई-वडिलांबरोबरच लहान भाऊसुद्धा आहे. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने त्यांनी आपल्या क्षमतेनुसार लग्नात खर्च करणार असल्याचे सांगितले. आकाश याचा पाईप बनविण्याचा छोटा व्यवसाय आहे. जून महिन्यात आकाशचे युवतीसोबत साक्षगंधही झाले. युवतीच्या तक्रारीनुसार साक्षगंधाच्या वेळी आकाशच्या कुटुंबीयांनी १९ नोव्हेंबरला लग्नाची तिथी ठरविली होती. त्यामुळे युवतीच्या वडिलांनी मंगल कार्यालय बुक केले होते. लग्नासाठी कपडे व दागिन्यांचीसुद्धा खरेदी केली होती. लग्नपत्रिकाही वाटल्या होत्या.
याच दरम्यान आकाशने व्यवसायाच्या नावाखाली १० लाख रुपयांची मागणी केली. युवतीने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. घरची परिस्थिती सांगितली. वडिलांच्या आजारात मोठा खर्च झाल्याचेही सांगितले. त्यामुळे एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे युवतीने सांगितले. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आकाश व त्याचे कुटुंबीय लग्नास टाळाटाळ करू लागले. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन बदनाम करू लागले. त्यांनी लग्नासही नकार दिला होता.
तोपर्यंत युवतीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी ४ लाख २१ हजार रुपये खर्च केले होते. त्यांनी आकाश व त्याच्या कुटुंबीयांना समजविण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु आकाशने नोव्हेंबर २०१७ मध्ये दुसऱ्या मुलीशी साक्षगंधही करून घेतले होते. ही माहिती पीडित युवती व तिच्या कुटुंबीयांना मिळाल्यामुळे ते संतप्त झाले. युवतीने एक महिन्यापूर्वी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस उपनिरीक्षक कांडेकर यांनी तपासानंतर आरोपींच्या विरोधात फसवणूक व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.