सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने विवाह संस्थेवर आघात : विकास सिरपूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 09:59 PM2019-01-30T21:59:51+5:302019-01-30T22:03:46+5:30
सर्वोच्च न्यायालयाद्वारे व्याभिचाराला आणि समलैंगिकतेला मान्यता देण्याचा निर्णय समाज आणि धर्मापेक्षा व्यक्तीला महत्त्व देउन घेण्यात आल्याचे दिसून येते. मात्र भारतीय संस्कारानुसार व्यक्तीपेक्षा समाज आणि धर्म मोठा आहे. त्यामुळे धर्माने कायम केलेल्या पवित्र संकल्पना आणि मूल्याने निर्माण केलेल्या विवाह संस्थेवर न्यायालयाच्या निर्णयाने आघात झाला आहे, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले. ‘सहजीवन’ या विषयाला धरून तयार करण्यात आलेल्या स्मिता स्मृती विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाद्वारे व्याभिचाराला आणि समलैंगिकतेला मान्यता देण्याचा निर्णय समाज आणि धर्मापेक्षा व्यक्तीला महत्त्व देउन घेण्यात आल्याचे दिसून येते. मात्र भारतीय संस्कारानुसार व्यक्तीपेक्षा समाज आणि धर्म मोठा आहे. त्यामुळे धर्माने कायम केलेल्या पवित्र संकल्पना आणि मूल्याने निर्माण केलेल्या विवाह संस्थेवर न्यायालयाच्या निर्णयाने आघात झाला आहे, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले. ‘सहजीवन’ या विषयाला धरून तयार करण्यात आलेल्या स्मिता स्मृती विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असलेल्या या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी धनवटे सभागृह, शंकरनगर येथे पार पडला. याप्रसंगी डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. वि.स. जोग, गिरीश गांधी, डॉ. असरा खुमुशी, नगरसेविका प्रगती पाटील, कवी, लेखक व विशेषांकाचे संपादक अरुण शेवते आदी मान्यवर उपस्थित होते.
न्या. विकास सिरपूरकर म्हणाले, न्यायालयाचे निर्णय पटणे किंवा न पटणे हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. मात्र आपल्याला हा निकाल पटलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. व्यक्ती मोठा की समाज मोठा हा तिढा मात्र या निकालात दिसून येतो. समलैंगिकतेला मान्यता देणे म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाण्याला मान्यता देण्यासारखे असल्याचे मत त्यांनी मांडले. ज्या पवित्र आहेत, शास्वत आहेत अशा संकल्पनांना धरून ठेवणे म्हणजे धर्म होय आणि भारतीय परंपरेत धर्माला सर्वोच्च मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे व्याभिचार व समलैंगिकतेचे निर्णय हे सद्सद््विवेक बुद्धीने घेणे आवश्यक आहे. कोणताही विवाह यशस्वी करण्यासाठी तळजोड व परिपक्वतेची गरज असते. ही परिपक्वता ज्ञानातून, अनुभवातून येते व त्यालाच विवाहसंस्था असे संबोधले जाते. त्यामुळे या विवाह संस्थेचा आदर महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.
डॉ. वि.स. जोग यांनीही समलैंगिकता, विवाहबाह्य संबंध व लिव्ह ईन नात्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निर्णयावर टीका केली. या निर्णयाविरूद्ध काँग्रेस, रा.स्व. संघ व कम्यूनिस्ट पक्षाने रान उठवायला पाहिजे होते, पण तसा विरोध झाला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. विवाहामध्ये समन्वय, सामंजस्य आवश्यक आहे. संस्कार व नमाज रियाजाशिवाय विवाह यशस्वी होउ शकत नाही. अहंकार हा सहजीवनाचा शत्रू आहे, असे मतही त्यांनी मांडले.
डॉ. पी.डी. पाटील यांनी अंकाचे कौतुक करीत विवाहातील सामंजस्य, समजूतदारपणा व शांती शिकविणारा असल्याचे मनोगत मांडले.
रत्ना कम्युनिकेशनच्यावतीने ‘सहजीवन’ या विषयावर ३२ वा स्मिता स्मृती विशेषांक साकार करण्यात आला आहे. विशेषांकामध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काजोल अजय देवगन, परेश रावळ, प्रतीक्षा लोणकर, स्पृहा जोशी, जॉनी लीव्हर, प्रकाश आमटे, डॉ. रवींद्र कोल्हे, सतीश गोगुलवार आदी मान्यवरांचे त्यांच्या यशस्वी सहजीवनाचे अनुभव मुलाखतीतून मांडण्यात आले असल्याची माहिती गिरीश गांधी यांनी प्रास्ताविकातून दिली. अरुण शेवते यांनीही आपले मनोगत मांडले. संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले तर राजेश पाणूरकर यांनी आभार मानले.