शादी हो या सगाई... रात्री नऊच्या अगोदर आटपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 06:54 PM2021-12-25T18:54:23+5:302021-12-25T18:56:13+5:30
Nagpur News ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.
नागपूर : लग्न असो अथवा सगाई रात्री नऊच्या आतच सर्व आटोपावे लागेल, अन्यथा कडक कारवाई होऊ शकते. ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी उपराजधानीत पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना संबंधाने पत्रकारांशी शनिवारी दुपारी चर्चा केली.
आवश्यक उपाययोजना केल्यास आणि सतर्कता बाळगल्यास कोरोना, ओमायक्रॉनचा धोका टाळता येतो. त्यामुळे राज्य सरकारने नव्याने काही अटी, नियम घालून दिले आहेत. त्याचे कसोशीने पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून पोलीस ॲक्टिव्ह मोडवर येणार आहेत. न्यू इयर सेलिब्रेशन, सभा, रॅली, आदी कार्यक्रमाच्या अनुषंगाने शहरात आठजणांना आम्ही रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली होती. ती परवानगी आता नऊ वाजेपर्यंतच राहणार असून, दोन रॅलींची परवानगी रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय पक्षाच्या पूर्वनियोजित सभांना (खुल्या ठिकाणी) जास्तीत जास्त अडीचशे जणांच्या उपस्थितांनाच मुभा आहे. लग्न असो वा रात्रीचे कोणतेही कार्यक्रम रात्री नऊ वाजेपर्यंत ठरावीक लोकांच्या उपस्थितीच घ्यावे लागेल. हॉटेल, रेस्टॉरंट अथवा कोणत्याही प्रकारच्या आस्थापना (दुकान) रात्री नऊनंतर सुरू दिसल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ऑनलाईन पार्सल मागविता येईल. मात्र, हॉटेल अथवा कोणत्या आस्थापनात येऊन पार्सल घेऊन जायला बंदी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संबंधाने हॉटेल असोसिएशन, तसेच व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना कळविण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
अडीच हजार पोलीस तैनात
आवश्यक कामानिमित्त रात्री बेरात्री रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या व्यक्तींना कसलाही त्रास होणार नाही, याची ग्वाही आयुक्तांनी दिली. मात्र, जाणीवपूर्वक अटी, शर्थींचे उल्लंघन करून ओमायक्रॉनचा धोका वाढविण्याचा प्रयत्न कुण्या आस्थापना संचालकांकडून करण्यात आला तर त्याची गय केली जाणार नाही, असेही आयुक्त म्हणाले. शनिवारी रात्रीपासून अडीच हजार पोलीस बंदोबस्त सांभाळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
----