लग्न की रुग्णसेवा? दहा दिवस राहिले असताना 'तिने' केली निवड..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 09:08 AM2021-05-07T09:08:19+5:302021-05-07T09:08:47+5:30
Nagpur News लग्न झाले तर नक्कीच सुट्या घ्याव्या लागतील व अटीतटीच्या प्रसंगी रुग्णांची सेवा करता येणार नाही, हा विचार तिच्या मनता आला. तातडीने निर्णय घेतला..
अंकिता देशकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत वडिलांना गमावल्यानंतर तिने लग्न सुरळीत व्हावे, यासाठी डॉक्टर या नात्याने रुग्णसेवा करत असताना तयारी केली होती. मात्र, अचानक दुसरी लाट आली अन् वैद्यकीय तज्ज्ञांची कमतरता जाणवायला लागली. लग्न झाले तर नक्कीच सुट्या घ्याव्या लागतील व अटीतटीच्या प्रसंगी रुग्णांची सेवा करता येणार नाही, हा विचार तिच्या मनता आला. तातडीने निर्णय घेतला व लग्नच करणार नसल्याचे जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. एकीकडे पीपीई किट घालून लग्न करणारे तरुण-तरुणी असताना नागपुरातील डॉ. अपूर्वा मंगलगिरीने नवा आदर्शच प्रस्थापित केला आहे.
डॉ. अपूर्वा मंगलगिरी शहरातील एका खासगी इस्पितळात कार्यरत आहेत. सकाळपासूनच विविध समस्यांसाठी रुग्णांचे फोन सुरू होतात. एप्रिल महिन्यात लग्नाची तारीख असल्याने तयारी सुरू होती. मात्र लग्नात मोजकेच लोक बोलविण्याचा विचार ठाम होता. लग्नात गर्दी बोलविली आणि पाहुणे दुसऱ्या दिवशी बाधित झाले, असा प्रकार तिला नको होता. दुसऱ्या लाटेदरम्यान कोविड वाॅर्डात सेवा देत असताना डॉ. अपूर्वा सर्वांची रोजची पायपीट व घालमेल बघत होती. सध्या रुग्णांवर उपचार करण्याचे माझे कर्तव्य जास्त महत्त्वाचे आहे, असे मला वाटले. त्यामुळेच मी लग्नाच्या १० दिवस अगोदर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या कुटुंबीयांशी मी चर्चा केली तेव्हा त्यांनादेखील ते पटले. तुझा आनंद ज्यात आहे ते कर, असे म्हणत ते माझ्या पाठीशी उभे राहिले, असे डॉ. अपूर्वाने सांगितले.
ज्या मुलाशी लग्न होणार होते, तोदेखील डॉक्टर होता व त्याच्या कुटुंबीयांना त्वरित लग्न करायचे होते. मात्र, ते शक्य नसल्याने डॉ. अपूर्वा यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. एका बंदिस्त जागेत २५ लोक एकत्रित आल्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा धोका असतो. ही बाबदेखील मला टाळायची होती. मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की अयोग्य, हे माहिती नाही. मात्र, माझ्यासाठी रुग्णसेवा सर्वांत जास्त महत्त्वाची आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.