नवऱ्याच्या अनैतिक संबंधामुळे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:01 AM2019-09-21T00:01:35+5:302019-09-21T00:03:01+5:30
बाहेरख्याली नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाहेरख्याली नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जयश्री विक्रम नारनवरे (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूला तिचा नवराच जबाबदार असल्याची तक्रार जयश्रीच्या आईने नोंदविल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी विक्रम नारनवरेला अटक केली.
आरोपी विक्रम नारनवरेचे जयश्रीसोबत २०१५ मध्ये लग्न झाले. त्याच्याकडे एका मोबाईल कंपनीच्या सीमकार्डची एजन्सी असून, शताब्दी चौकात त्याचे कार्यालय आहे. विक्रमचे नातेवाईक प्रॉपर्टी डीलिंगसह अन्य काही व्यवसाय करतात. काही महिन्यांपासून विक्रमचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयश्रीला होता. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. विक्रम तिला मारहाण करायचा. टोचून बोलायचा. या प्रकारामुळे जयश्री अस्वस्थ राहायची. माहेरच्या मंडळींना या दोघातील वादाची कल्पना होती. त्यांच्यात वारंवार वाद होत असल्यामुळे विक्रमने चार महिन्यांपूर्वी वडिलांचे घर सोडून हुडकेश्वरमधील महालक्ष्मीनगरात भाड्याचे घर घेतले होते. तेथे हे दोघेच राहत होते. नेहमीप्रमाणे विक्रम आज सकाळी घराबाहेर गेला. दुपारी १ च्या सुमारास तो परत आला असता त्याला जयश्री सिलींग फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. त्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नातेवाईकांनाही कळविले. जयश्रीला खाली उतरवून मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती कळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी जयश्रीच्या घरी जाऊन तिच्या रूमची झडती घेतली असता एक सुसाईड नोट मिळाली. विक्रमचे दुसऱ्या तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे आणि त्याच्याकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याने जयश्रीने या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे, असे हुडकेश्वरचे ठाणेदार संदीप भोसले यांनी सांगितले. या चिठ्ठीमुळेच प्रारंभी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जयश्रीच्या आईची तक्रार
मुलीच्या मृत्यूचे वृत्त कळताच जयश्रीच्या माहेरची मंडळी शोकसंतप्त झाली. तिला फाशी देऊन मारले आणि आत्महत्येचा दिखावा करण्यात येत असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी लावला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले. तेथे जयश्रीने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पाहून हे प्रकरण आत्महत्येचेच असल्याचे पोलिसांनी जयश्रीच्या माहेरच्यांना पटवून दिले. दरम्यान, आरोपी विक्रम जयश्रीला माहेरून हुंड्याची रक्कम आणावी म्हणून छळत होता. त्याचे दुसरीकडे अनैतिक संबंध असल्यामुळे तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. या छळाला कंटाळूनच जयश्रीने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूला विक्रम नारनवरेच कारणीभूत असल्याची तक्रार जयश्रीची आई रेखा दुरुतकर यांनी हुडकेश्वर ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून विक्रमलाअटक केली.