बायको असताना बलात्कार करणाऱ्या नवऱ्याला दहा वर्षे कारावासाची शिक्षा; सत्र न्यायालयाचा निर्णय : लग्नाचे आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसविले
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 23, 2024 02:43 PM2024-04-23T14:43:37+5:302024-04-23T14:47:00+5:30
Nagpur : विवाहित पुरुषाने लग्नाचे आमिष दाखवून केला अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; कोर्टाने सुनावली १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
नागपूर : घरी बायको असताना अल्पवयीन बालिकेवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नवऱ्याला १० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एच. सी. शेंडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना वाडी येथील आहे.
संघपाल किशोर सनकाळे (२५) असे आरोपीचे नाव असून तो दत्तवाडी येथील रहिवासी आहे. पीडित बालिकेला ठार मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याकरिता त्याला २ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. आरोपीने दंडाची रक्कम जमा केल्यास त्यातील १५ हजार रुपये पीडित बालिकेला भरपाई म्हणून अदा करा, असे निर्देशदेखील न्यायालयाने दिले. घटनेच्या वेळी पीडित बालिका १६ वर्षे ७ महिने वयाची होती. आरोपीने तो विवाहित असल्याची माहिती लपवून ठेवली होती.
२०२२ मध्ये त्याने पीडित बालिकेसोबत मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविले. त्यानंतर लग्न करण्याचे आमीष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसेच, हे कुकृत्य लपवून ठेवण्यासाठी तिला ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, बालिकेच्या पालकांना तिच्या अनैतिक संबंधाची माहिती कळल्यामुळे तिने आरोपीसोबतचा संपर्क तोडला. परंतु, आरोपीने माघार घेतली नाही. तो तिला विविध मार्गाने त्रास द्यायला लागला. परिणामी, पीडित बालिकेने २९ जून २०२२ रोजी वाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिस उपनिरीक्षक शकुंतला गोबाडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. सरकारच्या वतीने ॲड. श्याम खुळे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी ११ साक्षीदारांचे जबाब व इतर ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले.