नागपुरात मेट्रोच्या ट्रेलरने मार्शलला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:52 AM2018-04-19T00:52:10+5:302018-04-19T01:32:49+5:30
वर्धा रोडवरील चिंचभवन पुलाजवळ वाहतूक संचालित करीत असलेल्या मेट्रो रेल्वेच्या मार्शलला ट्रेलरने चिरडले. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला. वैभव प्रभाकर गाडेकर (१९) रा. न्यू सुभेदार ले-आऊट असे मृताचे नाव आहे. गेल्या १४ तासात रस्ते अपघातात तिघांना जीव गमवावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा रोडवरील चिंचभवन पुलाजवळ वाहतूक संचालित करीत असलेल्या मेट्रो रेल्वेच्या मार्शलला ट्रेलरने चिरडले. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला. वैभव प्रभाकर गाडेकर (१९) रा. न्यू सुभेदार ले-आऊट असे मृताचे नाव आहे. गेल्या १४ तासात रस्ते अपघातात तिघांना जीव गमवावा लागला.
वैभव हा मेट्रो रेल्वे प्रकल्पात ‘ट्राफिक मार्शल’ म्हणून काम करीत होता. रात्री १२.३० वाजता ट्रेलर क्रमांक एनएल/०२/एन.१३२५ काँक्रिट गर्डर घेऊन खापरीवरून मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सेंट्रल जेल स्टेशनवर आणले जात होते. काँक्रिट गर्डरला जोडून मेट्रो रेल्वेच्या पुलाचेही काम केले जात आहे. एका काँक्रिट गर्डरचे वजन ७० टन होते. गर्डर किंवा दुसऱ्या जड वस्तूची ने-आण केली जात असताना ट्रेलरमध्ये मार्शल (सुरक्षा कर्मचारी ठेवला जातो.) मार्शल ट्रेलर हा चालकाला रस्ता दाखविण्यास मदत करतो. चिंचभवन पुलाजवळ रस्ता अतिशय रुंद असल्याने वाहतूक संचालित करण्यासाठी मेट्रोच्या मुन्ना नावाच्या मेकॅनिकने वैभवला ट्रेलरखाली उतरण्यास सांगितले. वैभव खाली उतरून ट्रेलरच्या मध्य भागात उभा होऊन चालकास ‘साईड’ दाखवू लागला. त्याचवेळी चिंचभवनच्या दिशेकडून एक कार भरधाव गतीने आली. कार आपल्याला उडवेल या भीतीने वैभव घाबरला आणि तो लगेच मागे सरकला. परंतु याबाबत ट्रेलर चालकाला काहीच माहीत नसल्याने त्याने ट्रेलर समोर नेण्याच्या प्रयत्नात वैभवला चिरडले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चालक ट्रेलर सोडून फरार झाला.
वैभवच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचे वडील पूर्वी आॅटो चालवीत होते. हा धंदा चालत नसल्यामुळे ते पेंटिंगच्या कामाला जातात. हे कामही नियमित नसते. वैभवच्या कुटुंबात आई-वडील आणि मोठी बहीण प्रियंका आहे. प्रियंका मूक-बधिर आहे. वैभवने बारावीची परीक्षा दिली होती. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने तो शिक्षणासोबतच नोकरीही करीत होता.
ट्राफिक संचालित करणाऱ्या मार्शलचाच अपघातात मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे अपघात वाढले आहेत. लहान-मोठ्या घटनांमध्ये तर पीडित पोलिसांपर्यंत पोहोचतही नाहीत.दुसरी घटना छत्रपती चौकात घडली. येथे एका ट्रकचालकाने बाईकस्वारास चिरडले. चंद्रशेखर देशमुख (५८) रा. नरेंद्रनगर असे मृृताचे नाव आहे. देशमुख हे सकाळी ९.३० वाजता बाईकने ड्युटीवरून घरी जात होते. छत्रपती चौकातील प्रगती सभागृहाजवळ देशमुख यांच्यासमोरून बस जात होती. बस थांबल्याने देशमुख यांनीही गाडीला ब्रेक मारला. ते थांबताच त्यांच्या मागून आलेल्या ट्रकने (एमएच/४०ए/७८१२) त्यांना चिरडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. देशमुख यांच्या कुटुंबात पत्नी रश्मिका आणि १४ वर्षाची मुलगी अबोली आहे. दोघेही अमरावतीला गेले आहेत. देशमुख हे मूळचे अमरावतीचे होत.
त्याचप्रकारे कळमन्यात ट्रेलरखाली झोपलेल्या चालकाला आपला जीव गमवावा लागला. शुभ्रमणी सुब्रैय्या (४५) रा. तामिळनाडू असे मृताचे नाव आहे. सुब्रैय्या ट्रेलर चालक आहे. तो आपल्या साथीदारासह नागपूरला आला होता. तो बुधवारी दुपारी २.३५ वाजता उमिया वसाहत येथील महालक्ष्मी धर्मकाट्यासमोर ट्रेलर क्रमांक एमएच ४६/३५१२ खाली झोपला होता. त्याला दुसऱ्या एका ट्रेलर चालकाने सुब्रैय्याला चिरडले. घटनेची माहिती होताच ट्रेलर चालक फरार झाला. कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.