कोकेन तस्कर विमानतळावर जेरबंद
By admin | Published: May 20, 2017 02:53 AM2017-05-20T02:53:57+5:302017-05-20T02:53:57+5:30
कोकेनची खेप घेऊन मुंबईहून विमानाने नागपुरात आलेल्या एका तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
मुंबईहून आला नागपुरात : हैदराबादला पोहचणार होती खेप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोकेनची खेप घेऊन मुंबईहून विमानाने नागपुरात आलेल्या एका तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शुक्रवारी सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे विमानतळ परिसरात खळबळ निर्माण झाली होती.
सत्यप्रकाश उर्फ सर्वेश मिश्रा (वय ३०) असे पोलिसांनी अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. तो मुंबईतील रहिवासी आहे. तो कोकेनची खेप घेऊन एक तस्कर इंडिगो फ्लाईट क्रमांक ४०३ ने मुंबईहून नागपूरकडे निघाला आहे. तो काळी टी शर्ट घालून आहे आणि २८ क्रमांकाच्या सीटवर बसला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर पोहचलेला हा तस्कर येथून परप्रांतात जाणार असल्याची माहितीही गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांना मिळाली. त्यावरून कदम यांनी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला सायंकाळी ६ च्या सुमारास नागपूर विमानतळावर पाठविले. या पथकाने बारकाईने पाहणी केल्यानंतर संशयास्पद अवस्थेत असलेल्या मिश्राला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ कोकेन आढळले. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे विमानतळ परिसरात खळबळ निर्माण झाली. मिश्राला ताब्यात घेतल्यानंतर विमानतळावरून गुन्हे शाखेत नेण्यात आले. तेथे त्याची वृत्तलिहिस्तोवर चौकशी सुरू होती. यासंदर्भात विचारणा केली असता, आरोपी मिश्रा हा ५.३० च्या विमानाने नागपुरात आला. येथून तो विमानाने हैदराबाद येथे जाणार असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले असून, त्याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे उपायुक्त कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अनेक ग्राहकांची नावे उघड
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कोकेन तस्कराने नागपूर आणि हैदरबाद येथील अनेक कोकेन शौकिनांची नावे पोलिसांना सांगितल्याचे समजते. हे सर्व कोकेन शौकीन ग्राहक हायप्रोफाईल असून, यात काही बुकींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वी सर्वेशने नागपुरात एक मोठी कोकेन खेप आणली होती, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे.