पुलवामातील शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साकारले शहीद स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 09:22 PM2020-02-13T21:22:53+5:302020-02-13T21:25:12+5:30
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या आनंदात अनेकांना मागील वर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा विसर पडला आहे. परंतु नागपुरातील गायत्री अभय घुसे हिने मात्र पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मरणच केले नाही तर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक आकर्षक शहीद स्मारक साकारून त्यांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अख्खी तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी योजना आखत आहे. परंतु व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या आनंदात अनेकांना मागील वर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा विसर पडला आहे. परंतु नागपुरातील गायत्री अभय घुसे हिने मात्र पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मरणच केले नाही तर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक आकर्षक शहीद स्मारक साकारून त्यांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे.
गायत्री झिंगाबाई टाकळी येथील भारतीय कृषी विद्यालयात नवव्या वर्गात शिकते. तीन वर्षांपासून शाळेतून पहिली येण्याचा बहुमान तिला मिळत आहे. अभ्यासात हुशार असण्यासोबतच तिला कलाकृती साकारण्याची आवड आहे. ५ जानेवारीला गायत्रीचा वाढदिवस होता. आप्तस्वकीयांना बोलावून तिच्या कुटुंबीयांनी तिचा वाढदिवस साजरा केला. यात तिला भेट म्हणून काही रक्कम मिळाली. या रकमेचे काय करायचे असा विचार तिच्या मनात सुरू होता. पुलवामा घटनेला १४ फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद स्मारक साकारण्याचा निर्णय तिने घेतला. त्यासाठी तिने तयारी केली. लाकडाची स्टेनगन तयार केली. त्यावर टोपी घातली. ही कलाकृती आकर्षक दिसावी यासाठी तिने त्यावर ४४ लहान स्टोन लावले. स्टेनगनवर लावलेली टोपी आणखी चांगली दिसावी यासाठी तिने ती टोपी दागिन्यांनी सजवली. अशा प्रकारे तिने पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहीद स्मारक साकारून आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वडिलांपासून मिळाली प्रेरणा
गायत्री घुसे हिचे वडील मूर्तिकार आहेत. लहानपणापासून वडील साकारत असलेल्या कलाकृती गायत्री पाहते. यातूनच तिला कलाकृती तयार करण्याची आवड निर्माण झाली. दोन वर्षांपूर्वी १५ ऑगस्टला गायत्रीने नारळाच्या १५१ फुलांचा वापर करून तिरंग्याची कलाकृती साकारली होती.
‘लोकमत’ला देणार शहीद स्मारक
लोकमत सर्व विषयांच्या स्पष्ट आणि विस्तृत बातम्या प्रकाशित करते. ‘लोकमत’ मुळे राज्यातील, देशातील घडामोडी घरबसल्या कळतात. त्यामुळे शहीद स्मारकाची तयार केलेली कलाकृती ‘लोकमत’ला भेट देण्याचा निर्णय गायत्री आणि तिचे वडील अभय घुसे यांनी घेतला आहे.