जिल्हा न्यायालयातील मसन्या उद पिंजरा तोडून पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 12:05 AM2021-06-19T00:05:00+5:302021-06-19T00:06:03+5:30
Masanya ud जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आठव्या माळ्यावर आढळून आलेला मसन्या उद हा दुर्मिळ प्राणी गुरुवारी रात्रीच पिंजरा तोडून पळून गेला. त्याला पकडण्याचे वन कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आठव्या माळ्यावर आढळून आलेला मसन्या उद हा दुर्मिळ प्राणी गुरुवारी रात्रीच पिंजरा तोडून पळून गेला. त्याला पकडण्याचे वन कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
आठव्या माळ्यावरील खोलीचे टिनाचे छत व आत लावलेल्या फायबर प्लेट्समधील मोकळ्या जागेत मसन्या उद लपला होता. वन कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला त्याला जाळीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा आतमध्ये शिरला. त्यानंतर पाऊस सुरू झाला व अंधारही पडला. परिणामी, मसन्या उदला पकडण्यासाठी अधिक प्रयत्न करता आले नाही. त्यामुळे वन कर्मचारी खोलीमध्ये पिंजरा ठेवून परत गेले. मसन्या उदला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात मांसाचा तुकडा ठेवण्यात आला होता. रात्री या ठिकाणी कुणीच नव्हते. दरम्यान, केव्हातरी मसन्या उदने पिंजऱ्यात प्रवेश केला. तो आत शिरताच पिंजऱ्याचे दार बंद झाले. त्यानंतर मसन्या उदने पिंजऱ्यातील मांसाच्या तुकड्यावर ताव मारला व पिंजरा तोडून पळ काढला. शुक्रवारी सकाळी वन कर्मचारी परिस्थिती पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेल असता मसन्या उद कुठेच आढळून आला नाही. पिंजरा तुटलेल्या अवस्थेत होता व मांसाचा तुकडा तेथे नव्हता. मसन्या उदच्या या करामातीमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कोरोना संक्रमणामुळे जिल्हा व सत्र न्यायालयात दीर्घ काळ केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी झाली. परिणामी, न्यायालयात फार कमी वकील येत होते. त्यातही आठव्या माळ्यावरील वकिलांच्या खोलीमध्ये क्वचितच कुणी जात होते. त्यामुळे या खोलीत मसन्या उदने राहुटी केली होती.