१.२२ कोटींचा दंड भरूनही मास्कची अ‍ॅलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:07 AM2021-01-18T04:07:51+5:302021-01-18T04:07:51+5:30

एनडीएसची २७८१७ लोकांविरुद्ध कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संक्रमण रोखण्यात मास्कची महत्त्वाची भूमिका आहे. असे असूनही शहरातील ...

Mask allergy despite paying a fine of Rs 1.22 crore | १.२२ कोटींचा दंड भरूनही मास्कची अ‍ॅलर्जी

१.२२ कोटींचा दंड भरूनही मास्कची अ‍ॅलर्जी

Next

एनडीएसची २७८१७ लोकांविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड संक्रमण रोखण्यात मास्कची महत्त्वाची भूमिका आहे. असे असूनही शहरातील काही बेजबाबदार नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता फिरतात. अशा नागरिकांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. साडेचार महिन्यात २७८१९ नागरिकांवर कारवाई करून १ कोटी २२ लाख ६६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई अजूनही सुरू आहे. असे असूनही अनेकांना मास्कची अ‍ॅलर्जी असल्याचे चित्र आहे.

नागपूर शहरात मार्च महिन्यात कोविड संक्रमणाला सुरुवात झाली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोविड संक्रमण अधिक होते. कोविड दिशानिर्देशानुसार मास्क लावणे आवश्यक आहे. असे असूनही अनेक जण मास्क लावत नाही. यामुळे मनपा आयुक्तांनी ४ सप्टेंबरला मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली. फक्त १२ दिवसांत ५४७० नागरिकांवर कारवाई करण्यात आली. संबंधिताकडून २०० रुपयांप्रमाणे १०.९४ लाख वसूल करण्यात आले. दररोज सरासरी ४५६ नागरिकांवर कारवाई केली जात होती. त्यानंतरही मास्क न लावणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले. त्यानुसार १५ सप्टेंबर ते १६ जानेवारी या दरम्यान शोध पथकाने २२३४९ नागरिकांवर कारवाई करून १ कोटी ११ लाख, ७४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. नागरिकांनी मास्कचा वापर, नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. कारवाईत पकडल्यानंतर नागरिक गयावया करतात. मात्र, स्वत:हून मास्कचा वापर करीत नाही.

.......

कारवाईतून कमाईचा हेतू नाही

मास्क न वापरणारे कोविड प्रसाराचे कारण ठरू शकतात. यामुळे प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. परंतु, ही कारवाई कमाईसाठी नाही, तर नागरिकांनी यापुढे तरी मास्कचा वापर करावा, हा हेतू असल्याचे उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी सांगितले.

...

झोननिहाय कारवाई दंड

लक्ष्मीनगर ४१८२ १९२५००

धरमपेठ ५२७६ २२९८७००

हनुमाननगर ३१६६ १४३०९००

धंतोली १९५० ७८५७००

नेहरूनगर १७८० ७८८३००

सतरंजीपुरा १७८५ ७९२०००

लकडगंज १६६२ ७३४१००

आसीनगर २३५३ ११९११००

मंगळवारी ३२४६ १४२१७००

मुख्यालय ३४५ १६०२००

(दंडाच्या रकमेत थोडाफार बदल असू शकतो)

Web Title: Mask allergy despite paying a fine of Rs 1.22 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.