हनुवटीवर मास्क, पहिल्याच दिवशी सारे बिनधास्त : बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 07:54 PM2021-06-07T19:54:01+5:302021-06-07T19:55:21+5:30
Unlock crowd in the market, Nagpur news अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागपूरकर बिनधास्त झाले. सकाळी बाजारपेठा उघडल्या. बरीच गर्दी झाली. दुपारनंतरही ती कायम होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागपूरकर बिनधास्त झाले. सकाळी बाजारपेठा उघडल्या. बरीच गर्दी झाली. दुपारनंतरही ती कायम होती. मात्र, अपवाद वगळता नियमांचे पालन कुठेच नव्हते. दुकानदारांसह ग्राहकांचेही मास्क हनुवटीवर आलेले होते. सॅनिटायझरचा वापरही अपवादानेच दिसत होता. मात्र, हे सर्व होऊनदेखील रोखणारे मात्र कुठेच दिसत नव्हते.
सकाळी बाजारपेठा उघडल्यावर भाजी बाजारासोबतच व्यापारपेठेतही चांगलीच गर्दी झाली. मार्च महिन्यानंतर पहिल्यांदाच रस्त्यांवरही गर्दी आणि वर्दळ वाढली. सकाळी ११ वाजेपर्यंत असलेली गर्दी दुपारनंतर काही प्रमाणात ओसरली. सायंकाळी ५ वाजता बाजारपेठा बंद होणार असल्याने दुपारी ३ वाजतानंतर पुन्हा गर्दी वाढलेली जाणवली. बर्डीवरील दुकाने दिवसभर गर्दीने बहरली होती.
शहरातील सर्वच भागात दुकाने आणि बाजारपेठा उघडल्या. काही दुकानदारांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर केला असला तरी अशी दक्षता घेणाऱ्यांची संख्या अधिक नव्हती. कारवाईच्या भीतीपोटी मास्कचा वापर होताना दिसला, तरी दुकानदारांनी पूर्णवेळ मास्क वापरणे टाळले.
फेरीवाले, फळविक्रेते बिनधास्त
फेरीवाले तसेच फळविक्रेते बिनधास्त दिसले. अनेक विक्रेत्यांनी मास्क सांगण्यापुरतेच लावले होते. तोंडाऐवजी हनुवटीवर मास्क लावून व्यवहार सुरू असलेले दिसले. काहींनी कसलीही काळजी घेतलेली दिसली नाही. सिताबर्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले आहेत. खाद्यसामग्रीपासून ते कपडे, गारमेंट, बेल्ट, गॉगल्स विक्रेत्यांचा यात समावेश आहे. ग्राहकही बेदखल होते. काही ग्राहकांनी मास्कचा वापर केला असला तरी अनेकांची याबद्दल बेफिकिरी दिसली.
ऑटोचालकांनाही सक्ती नाही
ऑटो स्टँडवरील अनेक ऑटोचालक विना मास्कनेच दिसले. अनेकांनी मास्क हनुवटीवरच ठेवले होते. पहिल्या दिवशी शहरात वर्दळ वाढली. शहराच्या भागातून कामानिमित्त, खरेदीसाठी आलेल्यांची गर्दी होती. त्यामुळे ऑटोला चांगला व्यवसायही झाला. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने दखल घेतल्याचे फारसे दिसले नाही. बर्डी परिसरात वाहतूक पोलिसांसमोरच विना मास्कने ऑटोचालक ग्राहकांशी संवाद साधत आणि त्यांची ने-आण करीत होते. मात्र, या संदर्भात कारवाई होताना दिसली नाही.