रुग्ण कमी होताच मास्क झाले गायब! नागरिकांत बेजबाबदारपणा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 09:00 PM2021-10-11T21:00:04+5:302021-10-11T21:00:40+5:30
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली मात्र, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. परंतु रुग्णांची संख्या कमी होताच नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालेली आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
नागपूर : राज्यात नागपूरसह काही अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. परंतु रुग्णांची संख्या कमी होताच नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालेली आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात कारवाईला विरोध होत असल्याने मास्क न घालणाऱ्यांवरील कारवाई थंडावली आहे.
मागील काही महिन्यांत रुग्णांची संख्या कमी झाल्याने महापालिका प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. बाजारपेठा, मॉल, शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. परंतु, तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही टळलेला नाही. याचा विचार करता खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. परंतु प्रशासनाच्या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
मार्चपर्यंत कोरोना संक्रमण अधिक असताना विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात होती. परंतु, रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात होताच मास्क न वापरणाऱ्यांवरील कारवाई कमी झाली आहे.
विनामास्क कारवाई थंडावली
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे विनामास्क लोकांवर कारवाई सुरू आहे. मात्र, बाजारात वा सार्वजनिक ठिकाणी विनामास्क लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कारवाईला होणारा विरोध विचारात घेता पथकाला सक्ती करता येत नाही. यामुळे कारवाई कमी झाली आहे.
नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला
सणासुदीच्या दिवसांमुळे बाजारात गर्दी वाढली आहे. सोबतच विनामास्क लोकांची संख्या वाढली आहे. कारवाई टाळण्यासाठी अनेकजण मास्क लावतात. पण तोंडावर नसतो. काही जण खिशात मास्क ठेवतात. वास्तविक पथकाचा हेतू हा दंड वसुलीचा नाही. तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई केली जाते. परंतु बेजबाबदारपणा वाढला आहे. यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे त्यांच्याच हिताचे आहे.