नवरा, दीर आणि सासऱ्याकडून नवविवाहितेवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:08 AM2021-03-24T04:08:15+5:302021-03-24T04:08:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भांडेवाडी पारडीतील एका तरुणीचे लग्न करून देण्याच्या नावाखाली भंडारा जिल्ह्यातील दलालांनी दीड लाखात विक्री ...

Mass atrocities on newlyweds by husband, brother-in-law and father-in-law | नवरा, दीर आणि सासऱ्याकडून नवविवाहितेवर सामूहिक अत्याचार

नवरा, दीर आणि सासऱ्याकडून नवविवाहितेवर सामूहिक अत्याचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भांडेवाडी पारडीतील एका तरुणीचे लग्न करून देण्याच्या नावाखाली भंडारा जिल्ह्यातील दलालांनी दीड लाखात विक्री केली. तिला विकत घेणाऱ्या कुटुंबातील दोन मुले आणि बापाने या तरुणीवर तब्बल ३० दिवस सामूहिक अत्याचार केला. या संतापजनक घटनेचा मंगळवारी उलगडा झाला असून, पारडी पोलिसांनी या प्रकरणात दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीडित तरुणी २३ वर्षांची असून, ती भांडेवाडीत राहते. तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली, तुमसर आणि देवरी येथील तीन दलालांनी जानेवारी महिन्यात पीडित तरुणीच्या पालकांशी संपर्क साधला. सधन कुटुंबात मुलीचे लग्न लावून देतो, अशी थाप मारून या भामट्यांनी मुलीला जळगाव जिल्ह्यातील पारोडा येथे नेले. तेथे ३ फेब्रुवारीला पाटील परिवाराला एक लाख ६० हजार रुपयात तरुणीला विकले. त्याचवेळी तिचे २७ वर्षीय जगदीश सुका पाटील याच्याशी लग्न लावून दिले. लग्नाच्या चार-पाच दिवसानंतर रात्री सदर तरुणी झोपून असताना नवरा उठून गेला आणि तिचा दीर तिच्याजवळ आला. त्याने तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी तिने ही बाब नवऱ्याला सांगितली असता, त्याने ''हरकत नाही'' म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पुढचे चार-पाच दिवस पंकज नामक दीर तिचा विरोध मोडून काढत रोज बलात्कार करू लागला. या घटनेच्या दोन तीन दिवसांनंतर तिला दुसरा जबर धक्का बसला. तिचा सासरा रात्रीच्या वेळेस तिच्याकडे आला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे तरुणी हादरली. तिने आपल्या सासूला हा प्रकार सांगितला असता तिने काही होत नाही, असे म्हणत तिच्याकडे लक्ष दिले नाही.

यानंतर या प्रकाराची बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीचा छळ करणे सुरू केले. तिला डांबून ठेवणे, पुरेसे जेवण न देणे, असाही प्रकार सुरू झाला.

---

किती जणांशी लावले लग्न?

२ मार्चला तरुणीने संधी साधून वडिलांना फोन केला. यावेळी तिला तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. तुम्ही माझे लग्न किती लोकांसोबत लावून दिले, असा सवाल करत तिने आपली कर्मकथा पित्याला ऐकवली. ती ऐकून तरुणीचे वडील लगेच टेहू (जि. जळगाव)ला पोहोचले. त्यांनी आपल्या मुलीला सोबत नेण्याची तयारी केली असता, आरोपी पाटील बापलेकांनी आधी आमचे एक लाख ६० हजार रुपये परत करा, नंतर मुलीला न्या, असे म्हणत धमकावणे सुरू केले. मुलीच्या वडिलांनी गावकऱ्यांना हा गैरप्रकार सांगितला. पापाचा बोभाटा होत असल्याचे पाहून आरोपी नमले. त्याच

दिवशी (४ मार्च) त्यांनी पारोळा (जि. जळगाव) पोलीस ठाण्यात मुलीसह जाऊन या अत्याचाराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी जगदीश सुका पाटील, पंकज सुका पाटील आणि सुका सदा पाटील (सर्व रा. टेहू, ता. पारोळा, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत नागपुरात परतली.

---

दलालांनी झटकले हात

लग्न लावून दिल्याच्या नावाखाली ओळखीच्या आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे तरुणीच्या पित्याने साकोली, तुमसर आणि देवरी गाठून दलालांकडे विचारपूस केली असता त्यांनी असंबद्ध उत्तरे देऊन हात झटकले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी सामाजिक कार्यकर्ते नरेश जुमानी, उमेश प्रधान, कांताभाई वाघेला, सतीश भुरे, नीलेश सतीबावणे, प्रवीण मकवाना आणि अंकुश भोवते यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी आज सायंकाळी तरुणीच्या वडिलांसह पारडी पोलीस ठाणे गाठले. तेथे लग्नाच्या नावाखाली उपरोक्त दलालांनी फसवणूक केल्याची तक्रार तरुणीच्या पित्याने नोंदवली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात दलालांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

---

Web Title: Mass atrocities on newlyweds by husband, brother-in-law and father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.