कोरोनाला हरविण्यासाठी जनआक्रोशचे जनजागरण : मिनी बसमधून रोज आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:43 PM2020-04-16T23:43:13+5:302020-04-16T23:43:56+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळून साथ द्या, पोलिसांवर कठोर कारवाईची वेळ आणू नका, असे आवाहन सध्या जनआक्रोशच्यावतीने शहरात केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळून साथ द्या, पोलिसांवर कठोर कारवाईची वेळ आणू नका, असे आवाहन सध्या जनआक्रोशच्यावतीने शहरात केले जात आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच रामबाण उपाय आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही हेच आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याची तयारी जनआक्रोशने दर्शविली होती. ती मान्य करीत वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी परवानगी दिली. त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून अध्यक्ष डॉ. अनिल लड्डा यांच्या नेतृत्वात जनआक्रोशचे वेगवेगळे गट दररोज सहा निवडक व्यस्त आणि गर्दीच्या ठिकाणी लाऊडस्पीकर असलेल्या मिनी बसमधून जनजागरण करीत आहेत. नागरिकांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे, स्वच्छता राखणे, एका ठिकाणी चारपेक्षा जास्त व्यक्तींच्या समूहात एकत्र न जमणे, मनपा तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करीत असतात. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला मदत करा, असे आवाहन यातून केले जात आहे. सरकारच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन आणि दुर्लक्ष केल्यास होणाºया सामाजिक, वैद्यकीय आणि दंडात्मक परिणामांविषयी इशारा ते लोकांना देत असतात. संजय डबले, संजय वझलवार, आशिष नाईक, संजय ठाकरे, अनिल नखाते, मोहन व्याघ्र, उदय पानवलकर, गजानन राजूरकर, अशोक मराठे, श्रीकांत हरदास, उषा देव आदींचा या उपक्रमामध्ये सहभाग आहे. लॉकआऊट उठेपर्यंत जनआक्रोशचा हा प्रयत्न सुरू राहणार आहे.