सोयाबीन, धान, कापूस व संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:20 AM2019-11-26T11:20:52+5:302019-11-26T11:24:03+5:30

अतिवृष्टीमुळे विभागातील सोयाबीन, धान, कापूस व संत्रा या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीसंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानींची माहिती घेतली.

Massive loss of beans, paddy, cotton and orange crop | सोयाबीन, धान, कापूस व संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सोयाबीन, धान, कापूस व संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Next
ठळक मुद्दे परतीच्या पावसाने तोंडचा घासच हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिवृष्टीमुळे विभागातील सोयाबीन, धान, कापूस व संत्रा या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीसंदर्भातील प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी सोमवारी नागपूर विभागातील प्रत्यक्ष झालेल्या पिकांच्या नुकसानींची माहिती घेतली.
विभागातील आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीसंदर्भात पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे कापूस विकास संचालक आर.पी. सिंग यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, कृषी सहसंचालक रवींद्र्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आदी यावेळी उपस्थित होते.
पिकांच्या नुकसानीसंदर्भात विभागातील जिल्हानिहाय झालेल्या पीकहानीसंदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. या नुकसानीसाठी केंद्र्र शासनाकडून शेतकºयांना मदत मिळावी यासाठी केंद्रीय पथक आपला अहवाल सादर करणार आहे.
या परतीच्या पावसामुळे संत्र्याचा बहार गळून पडला असून, या फळांच्या गुणवत्तेचीसुद्धा मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कपाशीच्या पिकांच्या पात्या व बोंड्या मोठ्या प्रमाणात गळल्या असून, कपाशींच्या फुलांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. सोयाबीन शेतातच काढून ठेवल्यामुळे शेंगांना अंकुर फुटले असून, सोयाबीनच्या प्रत्यक्ष नुकसानीसंदर्भात छायाचित्र या पथकाला सादर करण्यात आले.
विभागात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे सांगताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, विभागात १०५.०८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जून ते आॅक्टोबर या महिन्यात ८३ दिवस पाऊस पडला असून, विभागात सरासरी १०३.५९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात सात दिवसात ५४.२१ म्हणजे ११०.९५ टक्के तर चंद्रपूर जिल्ह्यात सहा दिवसात ६१.५८ म्हणजेच ११८.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विभागात सरासरी ५३.५२ च्याऐवजी ९०.१२ टक्के एवढा पाऊस पाच दिवसात पडला आहे. प्रारंभी कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी स्वागत करून विभागातील पीक नुकसानीची माहिती दिली.

जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुके प्रभावित
नागपूर जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुक्यात, चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुक्यात, वर्धा जिल्ह्यात ८ पैकी ६ तालुक्यात, गडचिरोली जिल्ह्यातील १२ पैकी ६, भंडारा जिल्ह्यातील ७ पैकी ४ तालुक्यात तर गोंदिया जिल्ह्यातील ८ पैकी २ तालुक्यात मोठ्या प्रमाणात सतत परतीचा पाऊस पडला आहे.

सर्वाधिक धान पिकाचे नुकसान
विभागात सरासरी ८ लाख १९ हजार ०५९ हेक्टर क्षेत्रात धानाची पेरणी झाली होती. त्यापैकी आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ३३ टक्केपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रामध्ये विभागातील ७० हजार ४४९.१५ हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनमध्ये विभागात ४४ हजार ०२४.८३ हेक्टर क्षेत्रात, कापूस पिकाच्या ६५ हजार १९७.७९ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. त्यासोबतच नागपूर जिल्ह्यातील संत्रा या फळ पिकांतर्गत ७ हजार ३४२.६२ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे.

केंद्रीय पथक दिल्लीला रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय चमू पीक नुकसानीसंदर्भात पाहणी करण्यासाठी चंद्रपूरसाठी रवाना झाली होती. परंतु दिल्लीला कृषी विभागाला तातडीची बैठक बोलावल्याने पथक रवाना झाले.

Web Title: Massive loss of beans, paddy, cotton and orange crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती