स्त्रीत्व गमावलेल्या महिलांसाठी एक स्त्रीच आली धावून; या ‘ब्रा’द्वारे मिळतोय नवा आत्मविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 11:26 AM2022-05-18T11:26:16+5:302022-05-18T16:18:23+5:30
अनेक महिला कर्करोगाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात येतात. यामुळे ‘मॅस्टक्टॉमी’ करून एक किंवा दोन्ही स्तन काढण्याची वेळ येते. त्यामुळे अनेक स्त्रियांना मानसिक धक्का बसतो. नैराश्याचा सामना करावा लागतो.
नागपूर : स्तनाचा कर्करोगात काही महिलांवर ‘मॅस्टक्टॉमी’ उपचाराने स्तन काढण्याची वेळ येते. स्त्रीत्व गमावल्याचा मानसिकतेमुळे ताण, नकारात्मकता, भय व प्रियजनांपासून विभक्त होण्याची भीती असते. याची जाणीव असलेल्या एका महिला डॉक्टरने यासाठी पुढाकार घेतला. आपली कल्पक्ता प्रत्यक्षात उतरवून अशा स्त्रियांचे स्त्रीत्व बहाल करीत त्यांना नवा आत्मविश्वास दिला.
स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील त्या डॉक्टरचे नाव. त्यांच्यानुसार, भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. दर १८ महिलांमध्ये जवळपास एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हा आजार जरी गंभीर स्वरूपाचा असला, तरी वेळेत निदान झाल्यास व योग्य औषधोपचार झाल्यास तो बरा होऊ शकतो. परंतु अनेक महिला कर्करोगाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात येतात. यामुळे ‘मॅस्टक्टॉमी’ करून एक किंवा दोन्ही स्तन काढण्याची वेळ येते. त्यामुळे अनेक स्त्रियांना मानसिक धक्का बसतो. नैराश्याचा सामना करावा लागतो. काही तर घराबाहेर पडणेच टाळतात. स्वत:ला समाजापसून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा स्त्रियांना पुन्हा समाजात आणण्यासाठी कृत्रिम स्तन व ते ठेवण्यासाठी योग्य पद्धतीची ‘ब्रा’ तयार केली आहे.
-काय आहे ‘मास्टेक्टॉमी ब्रा’
ज्यांचे एक किंवा दोन्ही स्तन काढण्यात आले त्यांच्यासाठी ही ‘मास्टेक्टॉमी ब्रा’ आहे. ती खास अशा रुग्णांना डोळ्यांसमोर ठेवून डिझाइन केली आहे. यात असा खिसा तयार केला आहे ज्यात सहज कृत्रिम स्तन टाकता येते आणि नंतर ते सरकण्याची भीती दूर होते.
-गरजू महिलांना मोफत वितरण
डॉ. पाटील म्हणाल्या, स्तन कर्करोगावर मात केलेल्या विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रियांना भेटले. यातील काही त्यांच्या कुटुंबासाठी एकट्याच कमावणाऱ्या होत्या. त्यांना शेतात कामावर परत जाण्यास मनाई होती. कारण स्तनाशिवाय त्या वेगळ्या दिसत होत्या. आर्थिक चणचण आणि जागरुकतेचा अभाव यामुळे त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. अशा स्त्रियांना कृत्रिम स्तन व ब्रा मोफत देण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे अनेक जणींची स्थिती आता सामान्य झाली आहे.