मास्तर, नवा गणवेश कधी येणार?

By admin | Published: March 15, 2016 05:02 AM2016-03-15T05:02:08+5:302016-03-15T05:02:08+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदल झाल्यानंतर सोमवारी शहरातील विविध शाखांमध्ये यावर चर्चा सुरू

Master, new uniform? | मास्तर, नवा गणवेश कधी येणार?

मास्तर, नवा गणवेश कधी येणार?

Next

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदल झाल्यानंतर सोमवारी शहरातील विविध शाखांमध्ये यावर चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. संघविस्तारासाठी ‘हाफपॅन्ट’ऐवजी तपकिरी रंगाच्या ‘फुलपॅन्ट’चा गणवेशात समावेश केल्याच्या बाबीचे बहुतांश स्वयंसेवकांनी स्वागत केले. नवीन गणवेश कसा असेल याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता असून संघ मुख्यालय तसेच रेशीमबाग स्मृतिमंदिर येथे अनेक स्वयंसेवकांनी विचारणादेखील केली.
गेल्या पाच वर्षांपासून गणवेशात बदल होणार असे स्वयंसेवक ऐकत होते. अखेर रविवारी संघाच्या गणवेशाची ओळख असलेल्या खाकी ‘हाफपॅन्ट’ऐवजी तपकिरी रंगाची ‘फुलपॅन्ट’ या बदलावर शिक्कामोर्तब झाले.
सोमवारी सकाळच्या सुमारास शहरातील विविध भागात ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या शाखा भरल्या तर सायंकाळी ज्येष्ठांसोबतच बाल व शिशू स्वयंसेवकांच्या शाखा नेहमीप्रमाणे भरल्या.
यावेळी स्वयंसेवकांमध्ये नवीन गणवेश हाच मुद्दा दिसून आला. विविध शाखांचे मुख्य शिक्षक, शहर पदाधिकाऱ्यांना नवीन गणवेशासंदर्भात सातत्याने विचारणा होत होत्या. दरम्यान, संघाच्या या नवीन गणवेशाचे स्वयंसेवकांनी स्वागतच केले आहे. ‘हाफपॅन्ट’मुळे तरुण शाखांमध्ये येण्यासाठी कचरायचे. परंतु आता ‘फुलपॅन्ट’ आल्यामुळे शाखांमध्ये तरुणांची संख्या निश्चितच वाढेल, असे मत रामदासपेठ सायं शाखेच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केले. थंडीच्या दिवसांमध्ये प्रभात शाखेतील ज्येष्ठ स्वयंसेवकांना अडचण व्हायची, तरीदेखील आम्ही शाखेत यायचो. परंतु आता ‘फुलपॅन्ट’ असल्यामुळे थंडीची कुठलीही अडचण आम्हाला जाणवणार नाही, असे मत पश्चिम नागपुरातील एका शाखेतील स्वयंसेवकांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)

शारीरिक कसरतींच्या वेळी काय करणार?
दरम्यान, काही शाखांमध्ये नवीन गणवेश आणि शारीरिक कसरती यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये संवाद झाला. ‘हाफपॅन्ट’मध्ये शारीरिक कसरतींना काहीच अडचण येत नव्हती. परंतु ‘फुलपॅन्ट’मध्ये नियुद्ध, कसरती, योगासने इत्यादींमध्ये अडचणी येऊ शकतात. अशा वेळी ‘हाफपॅन्ट’चाच उपयोग करावा लागेल, असे मत नाव न छापण्याच्या अटीवर काही स्वयंसेवकांनी व्यक्त केले.

Web Title: Master, new uniform?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.