अवैध दारूविक्री रोखण्यासाठी 'मास्टर प्लॅन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:52 PM2019-09-23T23:52:39+5:302019-09-23T23:56:25+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेदरम्यान अवैध दारूचे उत्पादन, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेदरम्यान अवैध दारूचे उत्पादन, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस स्टेशननिहाय २० अवैध दारूच्या अड्ड्यांचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. या अड्ड्यांवर विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष नजर ठेवली जाईल.
संबंधित पथक या अड्ड्यांवर सातत्याने गस्त घालत राहील. यासोबतच सायंकाळी दारू विक्री करणारे हॉटेल, ढाबे आणि भोजनालयांवर धाड टाकली जाईल. या हॉटेल मालकांविरुद्ध महराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (ख)अंतर्गत कारवाई होईल. यात २५ हजार रुपयापर्यंत दंड आणि ३ वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. दुसरीकडे दारू पिणाऱ्यांवरही कलम ८४ अंतर्गत ५ हजार रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय डे ’ घोषित केल्यावर दारू विकणाऱ्या दुकानदाराचे परमिट रद्द केले जाईल. यासोबतच जिल्ह्याला लागू असलेले खुर्सापार, केळवद, सिरोंजी बडेगाव, चोरखैरी आदी ठिकाणी इतर राज्यातील येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाईल. यासाठी दिवसा एक दुय्यम निरीक्षक व जवान तर रात्रीच्या वेळी सहायक दुय्यम निरीक्षक व जवान तैनात राहतील. याशिवाय मध्य प्रदेशातील जिल्ह्यांना लागून असलेल्या सीमावर्ती मार्गावर ५ कि.मी.पर्यंत सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. निवडणूकदरम्यान १०२ होमगार्ड व ७ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत.
कॅमेरे मोबाईलशी राहतील ‘कनेक्ट’
विभागाने दारू कंपनी, गोदाम, परमिट बार, वाईन शॉप, बीअर शॉपी व देशी दारूचे दुकान, भट्टी आदींसमोर सीसीटीव्ही कॅमेर लावण्याची तयारी केली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल.
या अड्ड्यांवर राहील नजर
गिट्टीखदान - भिवसेनखोरी
हिंगणा - किन्ही, शेषनगर
बुटीबोरी- धवलपेठ
कळमेश्वर- गोंडखैरी
काटोल- डोंगरगाव, खानगाव, घुबडमेट
केळवद - तिडंगा, उमरी खदान
रामटेक - नगरधन, सारक
देवलापार- पांचाला, दाहुदा, पिकदा
उमरेड- दहेगाव, राजूरवाडी
कुही - चांपाल, वडद
भिवापूर- गरडेपार