'डबल रॅकेट'च्या सूत्रधाराला मुंबईतून अटक; गुंतवणुकीच्या नावाखाली करोडोंची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 10:36 PM2023-03-24T22:36:47+5:302023-03-24T22:37:22+5:30
Nagpur News गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम एका महिन्यात परत करण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार राजिक कुरेशी याला गुन्हे शाखेने मुंबईतील मीरा भाईंदर येथून अटक केली आहे.
नागपूर : गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम एका महिन्यात परत करण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार राजिक कुरेशी याला गुन्हे शाखेने मुंबईतील मीरा भाईंदर येथून अटक केली आहे. राजिकच्या अटकेने या रॅकेटमधील अनेक नव्या लिंकसमोर येतील.
दोन महिन्यांपूर्वी या रॅकेटचा भंडाफोड झाला होता व पोलिसांनी हसनबाग तसेच ताजबाग येथे छापे टाकून या रॅकेटशी संबंधित कुख्यात समशेर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. नंतर चार आरोपी उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये पकडले गेले. आतापर्यंत ८ ते १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार राजिक कुरेशी पोलिसांना सापडला नव्हता. आतापर्यंतच्या तपासात सुमारे आठ कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. नंदनवन पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. या रॅकेटला नंदनवनचे काही अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याचा आरोप झाल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला.
राजिक त्याच्या साथीदारांसह मुंबईतील मीरा- भाईंदरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तेथे छापा टाकून राजिक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. राजिकने ताजाबाद आणि हसनबाग परिसरात एजंट नेमले होते. त्यांच्याद्वारे लोकांना जाळ्यात ओढण्यात आले. त्याने एजंटला कार भेट दिली. त्यांना घर बांधण्यासाठी प्रलोभन देत होते. त्यामुळे अनेक लोक एजंट म्हणून कार्यरत होते. राजिक आणि त्याच्या साथीदारांना नागपुरात आणण्यात येत आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.