महाघोटाळ्याच्या सूत्रधार ‘हायटेक कॉपी’च्या ‘रॅकेट’मध्ये होता सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:43+5:302021-09-24T04:09:43+5:30
योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नीटच्या महाघोटाळ्याचा सूत्रधार परिमल कोतपल्लीवार हा मूळचा नागपूरचाच असून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ...
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नीटच्या महाघोटाळ्याचा सूत्रधार परिमल कोतपल्लीवार हा मूळचा नागपूरचाच असून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांची त्याची ही पहिली वेळ नाही. अशा प्रकारांमध्ये तो अनेक वर्षांपासून लिप्त आहे. २०१५ साली देशाच्या शिक्षणवर्तुळाला हादरविणाऱ्या ‘एआयपीएमटी’ परीक्षेत ‘हायटेक कॉपी’च्या ‘रॅकेट’मध्ये तो सहभागी होता. या प्रकारावर हरयाणा ‘एसआयटी’ची नजर होती व त्याला अटक करण्यात आली होती. मात्र सुटका झाल्यावर त्याने परत नवीन ‘रॅकेट’ सुरू केले.
एआयपीएमटी परीक्षेत अत्याधुनिक ‘गॅजेट्स’चा वापर करून ‘कॉपी’ करण्याच्या प्रकाराने देशभरातील शिक्षण वर्तुळाला हादरा बसला होता. या ‘रॅकेट’चा परिमल प्रत्यक्ष सूत्रधार नसला तरी तो महाराष्ट्रातील एजंट म्हणून काम करत होता. ‘मायक्रो स्पीकर्स’, ‘नॅनो इअर फोन्स’, ‘आयवॉच स्कॅनर’ इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थी बाहेर प्रश्न पाठवत होते व हरयाणाच्या बहरोद येथून त्यांना उत्तरे सांगण्यात येत होती. परिमलने तेव्हा प्रतिविद्यार्थी १७ लाख रुपयांच्या ‘डील’वर शहरातीलच सात विद्यार्थ्यांशी ‘डील’ केली होती. या गैरप्रकारांसाठी त्याने नागपुरातील ग्रेट नाग रोडवर कार्यालयदेखील स्थापन केले होते. हरयाणा पोलिसांच्या ‘एसआयटी’ने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली होती व तत्कालीन डीएसपी अमित भाटिया यांच्या नेतृत्वातील चमूने परिमलला ६ मे २०१५ रोजी अटक केली होती.
नियम कडक झाल्याने डमी उमेदवाराचा वापर
नीटने परीक्षेचे नियम कडक केले व विद्यार्थ्यांना अनेक अटींसह परीक्षाकेंद्रात प्रवेश देणे सुरू केले. त्यामुळे परिमलने कॉपीचा नाद सोडला व डमी उमेदवारच बसविण्याचा प्रकार सुरू केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
झटपट कमाईच्या नादात बनला एजंट
परिमल पुण्यातील एका वैद्यकीय विद्यार्थ्याच्या माध्यमातून संबंधित ‘हायटेक कॉपी’च्या ‘रॅकेट’शी जुळला होता. झटपट कमाईच्या नादात परिमलने गैरप्रकार करणे सुरू केले. उत्तर प्रदेशातदेखील त्याचे काही सहकारी होते. कॉपीसाठी परिमलने विद्यार्थ्यांना सर्व ‘गॅजेट्स’ पुरविले होते व हरयाणा-राजस्थान सीमेवरील एका रिसॉर्टवरून विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू असताना उत्तरे सांगण्यात येत होती.