माता अमृतानंदमयी, कैलाश सत्यार्थी 'जी-२०' बैठकीचे विशेष आकर्षण; १४ विषयांवर होणार मंथन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 11:26 AM2023-03-04T11:26:21+5:302023-03-04T11:28:56+5:30
५० देशांतून २५० प्रतिनिधींचा सहभाग
नागपूर : जी-२० च्या अध्यक्षपदाचा मान भारताला मिळाला आहे. त्या अंतर्गत देशातील वेगवेगळ्या राज्यांत बैठकांचे आयोजन होत आहे. डिसेंबरपासून बैठकांचे सत्र सुरू झाले असून, सप्टेंबर महिन्यात जी-२० ची शिखर बैठक होणार आहे. जी-२० अंतर्गत औरंगाबादेत झालेल्या डब्ल्यू-२० नंतर नागपूरला सी-२० चा मान मिळाला आहे. यात सिव्हिल सोसायटीशी संबंधित १४ विषयांवर मंथन होणार आहे. या सी-२० ची अध्यक्षता आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी करणार असल्याचे सिव्हिल २० इंडिया सचिवालयाचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
पत्रपरिषदेत सी-२० बद्दल माहिती देताना डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले की, २० मार्च रोजी या बैठकीचे उद्घाटन होणार आहे. बैठकीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नोबल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी, संयुक्त राष्ट्र संघाचे भारताचे प्रमुख शॉबी शार्प, जी-२० चे शेरपा अमिताभ कांत, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या निवेदिता भिडे, इंडोनेशिया, ब्राजील, अर्जेंटिना, इटली, अमेरिकाचे शेरपा उपस्थित राहणार आहेत. ५० देशांतील अडीचशे प्रतिनिधींचा यात सहभाग असेल.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीवर जबाबदारी
सी-२० मध्ये सिव्हिल सोसायटी संदर्भातील १४ विषयांवर मंथन होणार आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, पर्यावरण, पारंपरिक कारागिरी, सेवा, मानवाधिकार, लोकतंत्र आदी विषयांचा समावेश आहे. या विषयांवर वेगवेगळ्या देशांतून येणाऱ्या लोकांनी केलेल्या प्रयोगाची चर्चा होणार आहे. त्या प्रयोगांनी अंमलबजावणीच्या पातळीवर मिळविलेल्या यशावर चर्चा होईल. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्यावर ही परिषद यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी दिली आहे.
- सी-२० चे पथक येथे भेटी देणार
तीनदिवसीय या परिषदेत सहभागी होणारे प्रतिनिधी शहरातील फुटाळा तलावावरील म्युझिकल फाऊंटेन शो अनुभवणार आहेत. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात लोककलेचा आस्वाद घेणार आहेत. दीक्षाभूमीचे दर्शन घेणार आहे. रा. स्व. संघाच्या मुख्यालयालाही भेट देऊ शकतात. पेंच व देवलापार येथील गोविज्ञान केंद्राला भेटी देतील.
सी-२० च्या बैठकीत १४ विविध विषयांवर होणाऱ्या चर्चेतून जे निष्कर्श येईल, त्याचा अहवाल जी-२० च्या सचिवालयाला सादर होणार आहे. जी-२० च्या शिखर बैठकीत सी-२० च्या शिफारसीचे काही मुद्दे आपल्या अंतिम अहवालात समाविष्ट करून, त्याची अंमलबजावणी होणार आहे.
- डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, संरक्षक, सिव्हिल २० इंडिया सचिवालय