तात्त्विक ध्येयनिष्ठता राजकारणाचा गाभा
By Admin | Published: March 20, 2017 02:12 AM2017-03-20T02:12:16+5:302017-03-20T02:12:16+5:30
चळवळीतील कार्यकर्त्यांना राजकारणाचे आकर्षण असते आणि त्यात काही चुकीचे नाही.
दत्ता भगत : अ.भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाचा समारोप
नागपूर : चळवळीतील कार्यकर्त्यांना राजकारणाचे आकर्षण असते आणि त्यात काही चुकीचे नाही. मात्र निवडणुकीपुरते मर्यादित असलेले राजकारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नव्हते. या देशात स्वातंत्र्य, समता, बंधूत्व निर्माण व्हावे आणि अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून बाबासाहेबांनी राजकारणात सहभाग घेतला होता. राजकारणात अशी तात्विक ध्येयनिष्ठता बाबासाहेबांना अभिप्रेत होती, असे प्रतिपादन तेराव्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दत्ता भगत यांनी केले.
अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि निळाई परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अजंता सभागृह, उंटखाना येथे आयोजित तेराव्या अ.भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी पार पडला. या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म हा नवयान आहे. समतेचे व विज्ञानाचे तत्त्व त्यात आहे. या तत्त्वापर्यंत पोहचण्याचा प्रवास अवघड आहे. कारण या देशातील मनुवादी धर्मवाद्यांना मागासवर्गीयांनी विचारच करू नये, असे कायम वाटत आले आहे. अस्पृश्यांना माणूस म्हणून स्वीकारण्याची त्यांची तयारी आजही नाही. किंबहुना हिंदू धर्मात ही जाणीवच नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाचे प्रयत्न केले, मात्र त्यात सवर्णांच्या उपकाराची जाणीव होती. मात्र बाबासाहेबांनी ही उपकाराची जाणीवच नाहीशी करून अस्पृश्यांना स्वाभिमानाने पायावर उभे केले.
आंबेडकरांच्या अनुयायांना बाबासाहेबांच्या हयातीत त्यांचे चरित्र लिहिता आले नाही, याची खंत दत्ता भगत यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या वेळी महामंडळाचे अध्यक्ष प्रा. सतेश्वर मोरे, प्रा. विजय तायडे, अशोक बुरबुरे आदी मान्यवर उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन प्रवीण कांबळे यांनी केले. सुरेश वंजारी यांनी आभार मानले.
आंबेडकरी विचार
प्रचारकांचा सत्कार
साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा समाजात प्रचार-प्रसार करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. नाटक, पथनाट्य व इतर कलाप्रकारातून आजीवन सेवा देणाऱ्या ज्येष्ठ कलावंत अनंत टेंभुर्णे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. याशिवाय काष्ठ शिल्पकार दयाराम राऊत, भाजीपाला विकताना बाबासाहेबांचे सुविचार जनमानसापर्यंत पोहचविणारे विलास सूर्यवंशी आणि बुद्धधम्म आदर्श कवी मंडळ या भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सोबतच आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या आयोजित महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे प्रा. सतेश्वर मोरे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.(प्रतिनिधी)
संमेलनात १० ठराव पारित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व साहित्य प्रकाशन समितीला स्वायत्त संस्थेत रूपांतरित करावे, मराठी साहित्य संमेलनाला मिळणाऱ्या अनुदानातून काही निधी इतर साहित्य संमेलनाकडे समानपणे वळवावा, उच्च शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय थांबवावे, विश्वविद्यालय अनुदान आयोगाद्वारे सामाजिक अनुदान कपातीचा निर्णय रद्द करावा, देशातील विद्यापीठांमध्ये शासनाचा पाठिंबा असलेल्या सांस्कृतिक दहशतवादी संघटनांचा दहशतवाद वाढतो आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावल्या जात असल्याने शैक्षणिक वातावरण गढूळ होत आहे. तेव्हा या सांस्कृतिक दहशतवादाला पायबंद घालण्यात यावा, पाली विद्यापीठाची स्थापना नागपुरात करण्यात यावी, कृष्णा किरवले यांच्या हत्येचा निषेध आणि दाभोलकर, कॉ. पानसरे व कलबुर्गी यांचे मारेकरी व छुप्या शक्तींना शोधून कठोर शासन करावे, नागपूरच्या श्याम हॉटेल येथे राष्ट्रीय स्मारक निर्माण करावे, इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेले डॉ. आंबेडकरांचे साहित्य मराठीसह इतर भाषांमध्ये भाषांतरित करावे आणि तिबेटची चीनकडून मुक्तता करण्यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न करावे असे १० ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आल्याचे प्रा. अशोक बुरबुरे यांनी यावेळी सांगितले.