तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मातांच्या लसीकरणाला प्राधान्य ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:42+5:302021-07-10T04:06:42+5:30
- बालविकास प्रकल्प अधिकारी समन्वयक - जिल्ह्यात राबविणार अभिनव उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची तिसरी संभाव्य ...
- बालविकास प्रकल्प अधिकारी समन्वयक
- जिल्ह्यात राबविणार अभिनव उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता राज्य टास्क फोर्स यांच्याकडून वर्तविण्यात आली असल्यामुळे जिल्ह्यातील शून्य ते तेरा या वयोगटातील बालकांच्या मातांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. तेरा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बालके प्रभावित झाल्यास त्यांच्या देखभालीकरिता निश्चितच मदत होणार आहे. जिल्ह्यातील तेरा वर्षे वयोगटातील बालकांच्या मातांचे सर्वेक्षण करण्यात आले असून २ लाख १४ हजार बालकांच्या मातांना प्राधान्याने लस देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शुक्रवारी दिली.
संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली असून यामध्ये बालकांच्या आरोग्याबाबत विशेष दक्षता घेण्याबाबतही राज्य टास्क फोर्सच्या सूचना आहेत. नागपूर जिल्ह्यात पुरुषांबरोबरच महिलांचेही मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. जिल्ह्यात ८ लाख ८ हजार ९१९ महिलांचे लसीकरण झाले असल्याची माहिती यावेळी कुंभेजकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत १८ लाख ४१ हजार ९०४ नागरिकांचे लसीकरण झाले असून यामध्ये १४ लाख १५ हजार ५०५ नागरिकांनी पहिला डोस तर ४ लाख २६ हजार ३९९ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
शून्य ते तेरा वयोगटातील बालकांच्या मातांचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत असणाऱ्या पात्र माता-बालकांचे सर्वेक्षण करुन त्यांचे लसीकरण करुन देण्याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोविड-१९ अंतर्गत उपलब्ध असलेल्या लसीमधूनच बालकांच्या मातांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. या लसीकरणातून दैनंदिन स्वतंत्र अहवाल तयार करण्याच्या सूचना संबंधित लसीकरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.