माता मृत्यूचे प्रमाण वाढलेलेच
By admin | Published: July 10, 2017 01:54 AM2017-07-10T01:54:30+5:302017-07-10T01:54:30+5:30
मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे.
पाच वर्षांत पूर्व विदर्भात ११७० मातांचा मृत्यू : नागपूर, गडचिरोली, चंद्रपुरात सर्वाधिक नोंद
मातृ सुरक्षा दिन
सुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. २०११ ते १६ या पाच वर्षांत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ११७० मातांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक ६४५ मृत्यू एकट्या नागपूर शहरातील आहे. गडचिरोलीमध्ये १२४, चंद्रपूरमध्ये ११४ तर वर्धेत ९९ मातामृत्यूची नोंद आहे.
मातामृत्यू कमी व्हावा यासाठी राज्यात ‘प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान‘ (पीएमएसएमए) ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या मातांचे हिमोग्लोबिन कमी आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, पोटातील बाळाची वाढ व्यवस्थित झालेली नाही, प्लेटलेटची संख्या कमी आहे आदी माता या अतिजोखमीच्या गटात येतात.
या मातांना तातडीने सर्व सुविधा आहेत तेथे प्रसुतीसाठी पाठवले जाते. परिणामी, अनेक गर्भवती महिलांना या योजनेंतर्गत उपचार मिळाले आहेत. यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत झाली झाली आहे. मात्र, रुग्णालयातील हलगर्जीपणा, गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसुतीच्या वेळी मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याचे या क्षेत्रातीलच तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
प्रसुतीच्यावेळी माता मृत्यूचे कारण वेगवेगळे असू शकतात. माता मृत्यूचे ‘डेथ आॅडिट’ झाल्यास त्या कारणाला समजावून, व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे शक्य आहे. असे झाल्यास जास्तीत जास्त मातांचे प्राण वाचविले जाऊ शकतील.
-डॉ. वर्षा ढवळे, स्त्री रोग, प्रसूती तज्ज्ञ
गेल्या वर्षी २५६ मृत्यूची नोंद
नागपूर उपसंचालक आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०११-१२ मध्ये भंडारा जिल्ह्यात १८, गोंदियात १७, चंद्रपुरात ३२, गडचिरोलीत ३१, वर्धेत १५, नागपूर जिल्ह्यात ९, नागपूर शहरात ११७ असे मिळून नागपूर विभागात २३९ माता मृत्यूची नोंद आहे. तर, २०१५-१६मध्ये भंडाऱ्यात ८, गोंदियात ८, चंद्रपुरात १८, गडचिरोलीत २५, वर्धेत २७, नागपूर जिल्ह्यात १२ तर शहरात १५८ मिळून नागपूर सर्कलमध्ये २५६ मातामृत्यूची नोंद आहे. आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे वर्धा व नागपूर जिल्हा सोडल्यास इतर सर्व जिल्ह्यात मृत्यूची संख्या टप्प्याटप्याने कमी झाल्याचेही दिसून येते.