जमिनीच्या मोबदल्यासाठी मातृ सेवा संघ हायकोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:08 AM2021-03-23T04:08:57+5:302021-03-23T04:08:57+5:30
नागपूर : महाल येथील केळीबाग रोड रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्याकरिता मातृ सेवा संघाने मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
नागपूर : महाल येथील केळीबाग रोड रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्याकरिता मातृ सेवा संघाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने सोमवारी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१८ मध्ये केळीबाग रोड रुंदीकरणासाठी मातृ सेवा संघाची जमीन संपादित करण्यात आली. त्या जमिनीचा २ कोटी ६८ लाख रुपयांचा अवॉर्ड जारी करण्यात आला. तसेच ही रक्कम अदा करण्यासाठी मातृ सेवा संघाच्या बँक खात्याची माहितीही घेण्यात आली; परंतु सदर रक्कम अद्याप मातृ सेवा संघाला देण्यात आली नाही. दरम्यान, मातृ सेवा संघाने महानगरपालिकेला पत्र पाठवून रक्कम तातडीने अदा करण्याची विनंती केली. मनपाने त्यालाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मातृ सेवा संघाने उच्च न्यायालयात धाव घेऊन अवॉर्डची रक्कम १८ टक्के व्याजासह मिळण्याची व महानगरपालिकेवर ५० हजार रुपये दंड ठोठावण्याची विनंती केली आहे. मातृ सेवा संघाच्या वतीने ॲड. आनंद परचुरे यांनी कामकाज पाहिले.