नागपुरात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात मामा-भाच्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 09:29 PM2018-11-16T21:29:14+5:302018-11-16T21:33:06+5:30
घराजवळ कचरा टाकण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा खाली पडून मृत्यू झाला. पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तीन महिन्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घराजवळ कचरा टाकण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा खाली पडून मृत्यू झाला. पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तीन महिन्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.
पाचनल चौकाजवळ विनोद नामदेवराव नारायणे (वय ५२) आणि आयुष मेश्राम (वय २०) या दोघांचे आजूबाजूला घर आहे. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात नेहमी कुरबूर होत होती. ७ आॅगस्टला दुपारी २ च्या सुमारास त्यांच्यात घराजवळ कचरा टाकण्याच्या कारणावरून पुन्हा वाद झाला. त्याचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. त्यामुळे आयुष मेश्राम आणि त्याचा मामा विशाल ऊर्फ बाळू नगराळे या दोघांनी विनोद नारायणे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांना खाली आपटल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे नारायणे यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १६ आॅगस्टला डॉक्टरांनी नारायणे यांना मृत घोषित केले. त्यावेळी इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, विनोद नारायणे यांचा मृत्यू आरोपी आयुष तसेच बाळूच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप विशाखा विनोद नारायणे यांनी लावला होता. तशी तक्रारही इमामवाडा पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी त्याची चौकशी करून गुरुवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपी आयुष तसेच बाळूला अटक केली.