मातृत्व ही भावनाच वैश्विक
By Admin | Published: May 8, 2016 02:53 AM2016-05-08T02:53:35+5:302016-05-08T02:53:35+5:30
बाळ जन्माला येते तेव्हा त्याला कुठलीही भावना कळत नाही. ओळख नसतेच. पण एका व्यक्तीचा स्पर्श त्याला आपलासा वाटतो. रडणारे बाळ या एका स्पर्शाने आश्वस्त होते.
अपत्यांसाठी आईच असते त्यांचे जग
नागपूर : बाळ जन्माला येते तेव्हा त्याला कुठलीही भावना कळत नाही. ओळख नसतेच. पण एका व्यक्तीचा स्पर्श त्याला आपलासा वाटतो. रडणारे बाळ या एका स्पर्शाने आश्वस्त होते. ती फक्त आईच असते. आईच्या पोटातूनच ही आपुलकीची जाणीव कदाचित विकसित होत असावी. पण लहान बाळाला फक्त आईच कळत असते. ममत्वाच्या भावनेपुढे सारे धर्मभेद, प्रांत, भाषा गळून पडतात. मातृत्व ही भावना त्यामुळेच वैश्विक आहे. आई प्रत्येकाच्या आयुष्यातील हळवी जागा आहे. मनाच्याही गाभाऱ्यात सदैव असणारी एक मूर्ती म्हणजे आई.
भारतीय संस्कृतीत तर मातेला देवतेचा दर्जा दिला आहे. आपल्या अपत्यांसाठी झटणारी, प्रत्येक क्षणाला त्यांची काळजी करणारी, जपणारी, रडणारी, हसणारी आणि अत्यंत प्रामाणिक असणारी असते ती आईच. हे रसायनच विलक्षण आहे. ते निसर्गाने निर्माण केले आहे. ते कृत्रिम होतच नाही. बाळाला जन्म देण्यासाठी आनंदाने प्रसववेदना सहन करणारी आणि जन्मानंतर अपत्यांचा सांभाळ करणारी आईच. आयुष्यातील प्रत्येकाचे पहिले पाऊल आईच्याच साक्षीने. त्यानंतरचे धावणे आणि जीवनाच्या संघर्षात वेळोवेळी सांभाळून घेणारे स्थान म्हणजे आईच. आई साऱ्यांचेच आयुष्य व्यापून उरते. जगातील सर्वाधिक शक्तिशाली पुरुषही त्याच्या आईपुढे नतमस्तक होतो, कारण कुठलीही शक्ती मातृत्वाच्या भावनेपुढे फिक्की ठरते. आपल्या संस्कृतीत शक्तीचे स्वरूप म्हणून देवीलाच पूजले जाते. यामागे मातृत्वाचाच सलाम आहे.(वृत्त/४)