गणिताचा शिक्षक झाला सैतान, १२ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार
By योगेश पांडे | Published: April 12, 2023 04:03 PM2023-04-12T16:03:13+5:302023-04-12T16:04:35+5:30
शाळेच्या प्रयोगशाळेतच अनेकदा अत्याचार : जीवे मारण्याचीदेखील दिली धमकी
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मनुष्याच्या आयुष्याला दिशा दाखविणारी व्यक्ती अशी शिक्षकाची ओळख असते. मात्र नागपुरातील एका गणिताच्या शिक्षकाने अवघ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीच्या आयुष्याला अक्षरश: कुस्करून टाकले आहे. संबंधित शिक्षकाने सुमारे पाच महिने सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केला. आश्चर्याची बाब म्हणजे शाळेच्या प्रयोगशाळेतच त्याने अनेकदा कुकृत्य केल्यावरदेखील शाळेतील कुणालाही यावर संशय आला नाही. सैतान झालेल्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून यामुळे शाळेत तसेच शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय विठ्ठल पांडे (५७, कामगारनगर, जट्टेवार सभागृहाजवळ) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो एका शाळेत गणिताचा शिक्षक असून सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १२ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत सहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. आरोपी संजयची तिच्यावर सुरुवातीपासूनच वाईट नजर होती. त्याने तिला विश्वासात घेऊन प्रेम असल्याचे सांगितले व तिच्याशी लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली. कोवळ्या वयातील विद्यार्थिनीला त्याच्या मागील मनसुबे कळालेच नाही व ती त्याच्या जाळ्यात फसली. संजयने तिच्यावर शाळेतच अनेकदा अत्याचार केले. १० डिसेंबर २०२२ ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत हा प्रकार सुरू होता.
दरम्यानच्या काळात मुलीला पोटदुखीचा त्रासदेखील झाला. तिला आईने विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली होती. ५ एप्रिल रोजी आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने शिक्षक संजय पांडेच्या काळ्या कारनाम्यांची माहिती दिली. हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पेपर सुटल्यावरदेखील त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे मुलीच्या पोटात वेदना होत होत्या. मात्र तरीदेखील त्याने दया दाखविली नाही. याशिवाय जर कुणालाही हा प्रकार सांगितला तर जीवे मारण्याचीदेखील त्याने धमकी दिली होती. आईने अखेर हिंमत दाखविली व सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.
प्रयोगशाळेतच कुकृत्य
आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीवर अनेकदा जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले. बहुतांश वेळा तो तिला शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेतच घेऊन जात असे. गणिताचा शिक्षक विज्ञान प्रयोगशाळेत वारंवार जात असल्याचे शाळेत कुणाच्याही निदर्शनास कसे आले नाही व संशय कसा आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संजय पांडे लवकरच निवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीच्या वयात वासनांध झालेल्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"