नागपूर जिल्ह्यात मातृ वंदना योजना ठरतेय वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 08:17 PM2020-02-01T20:17:43+5:302020-02-01T20:19:41+5:30
मातामृत्यू व बालमृत्यूचा दर कमी व्हावा, सृदृढ बाळ जन्मास यावे, यासाठी राज्यात १ जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ही योजना महिलांसाठी वरदान ठरत असून ६६०८३ गर्भवती महिलांनी याचा लाभ घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मातामृत्यू व बालमृत्यूचा दर कमी व्हावा, सृदृढ बाळ जन्मास यावे, यासाठी राज्यात १ जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ही योजना महिलांसाठी वरदान ठरत असून ६६०८३ गर्भवती महिलांनी याचा लाभ घेतला आहे. त्यांना २५ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
या योजनेला नागपूर जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. शहरी भागातील (मनपा व नगरपालिका) हद्दीतील ३३ हजार ४७३ तर ग्रामीण भागातील ३२ हजार ६१० गर्भवती महिला व स्तनदा मातांनी योजनेचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागात बाळाचे पोषण होत नसल्याने कुपोषणाची समस्या आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ सुरू केली. ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत राबविली जाते. केंद्र व राज्य पुरस्कृत ही योजना केवळ पहिल्याच अपत्यासाठी व सरकारने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या स्त्रियांनाच लागू असून, लाभाची ५ हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यात संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होते. या योजनेच्या लाभासाठी जातीची व उत्पन्नाची अट नसून, शासकीय सेवेत नसणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. आर्थिक साहाय्याचा पहिला हप्ता गर्भवती मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळतो. दुसरा हप्ता बाळंतपूर्व तपासणी करताना गर्भधारणेच्या ११० दिवसानंतर तर योजनेतील तिसरा आणि शेवटचा हप्ता हा ती स्त्री प्रसुत झाल्यानंतर बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री केल्यानंतर मिळतो.
४११९३ महिलांना तिन्ही टप्प्याचे अनुदान वाटप
जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये या योजनेची ऑक्टोबर २०१७ पासून तर शहरी भागात ऑक्टोबर २०१८ मध्ये अंमलबजावणी सुरू झाली. आजवर या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण ६६ हजार ८३ गर्भवती मातांनी नोंदणी केली असून, यापैकी ५८ हजार ४२३ महिलांनी आजवर या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील लाभ घेतला आहे. ५७ हजार ६६७ गर्भवती मातांना योजनेचा दुसरा तर ४१ हजार १९३ महिलांना तिसऱ्या हप्त्याचे अनुदान वाटप केले आहे.
योजनेचा उद्देश बालमृत्यू, मातामृत्यू दर कमी करण्याचा असून, सृदृढ बाळ जन्मास यावे हा आहे. योजनेला जिल्ह्यात मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे.
डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.