गुंडाच्या कारमध्ये सापडले माउजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:27+5:302021-09-07T04:11:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एखादे मोठे गुन्हेगारी कृत्य घडविण्याच्या उद्देशाने माउजर व काडतुसासह गोळा झालेल्या गुन्हेगाराला मानकापूर पोलिसांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखादे मोठे गुन्हेगारी कृत्य घडविण्याच्या उद्देशाने माउजर व काडतुसासह गोळा झालेल्या गुन्हेगाराला मानकापूर पोलिसांनी पकडले. यात एका आरोपीला अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधारासह चार आरोपी फरार झाले.
नावेद अयाज शेख (२४) रा.साईबाबनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर फरार झालेल्या आरोपींमध्ये सलमान रहीम शेख (२४) रा.ओमनगर, नारा, नीलेश बोंडे (३४) रा.इंदोरा, शाहबाज उर्फ टीपू खान (३०) रा.डांगोरे ले-आउट, रा.बोखारा आणि त्यांचा एक साथीदार यांचा समावेश आहे. या टोळीचा मूख्य सूत्रधार सलमान शेख आहे. त्याने २०१५ मध्ये मानकापूर चौकात मोहीत पीटर याचा खून केला होता. या प्रकरणात सलमान सुटला होता. सूत्रानुसार सलमान ऑटो डीलिंगच्या नावावर गुन्हेगारी कृत्य करीत असतो. तो अनेक गुन्हेगारांशी जोडला आहे. आरोपी आपल्या इतर साथीदारांसह ४ सप्टेंबर रोजी रात्री मानकापूर इनडोअर स्टेडियमजवळ उभे राहून गुन्ह्याची योजना तयार करीत होते. पीएसआय मंगला मोकासे यांना याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तिथे धाड टाकली, तेव्हा आरोपी पळू लागले. नावेद पोलिसांच्या हाती लागला. तिथे सलमानची कार (क्र.एम.एच.१७- व्ही-१०८०) ही होती. कारची झडती घेतली असता, त्यात दोन माउज, ८ काडतुसे, लाेखंडी फरसा, मिरची पावडर आदी दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले.
नावेदने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, माउजर व काडतुसे सलमानची आहेत. तो नीलेश बोंडे याने बोलविल्यावर आला होता. असे सांगितले जाते की, सलमानसोबत पॅरोलवर आलेला कुख्यात अन्ना पलटी व त्याचे साथीदारही होते. नावेद सर्वांना ओळखत नसल्याने, तो सर्वांची नावे सांगू शकत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सात-आठ गुन्हेगार होते. ते एखादी मोठे गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशानेच जमले होते.