मविआ म्हणजे महाअनाडी आघाडी, देशहित त्यांच्या अजेंड्यावरच नाही; योगी आदित्यनाथ यांची टीका
By योगेश पांडे | Published: November 12, 2024 07:20 PM2024-11-12T19:20:33+5:302024-11-12T19:25:57+5:30
मोहन मते व प्रवीण दटके यांच्या प्रचारासाठी सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाविकास आघाडीतील नेते हे केवळ स्वार्थासाठीच राजकारण करतात. त्यांच्या अजेंड्यावर देश व समाजहित कधीही नव्हते आणि राहणारदेखील नाही. त्यांच्यासाठी केवळ व्होटबॅंकच महत्त्वाची आहे. प्रत्यक्षात महाविकासआघाडी ही खऱ्या अर्थाने महाअनाडी आघाडी आहे, या शब्दांत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडले. नागपुरातील रेशीमबाग परिसरात आयोजित प्रचारसभेदरम्यान ते मंगळवारी सायंकाळी बोलत होते.
नागपूर मध्यचे भाजपचे उमेदवार प्रवीण दटके व नागपूर दक्षिणचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपने देशाच्या सीमा सुरक्षित करत येथील परंपरा व इतिहासाची प्रतिके जपली आहेत. कॉंग्रेसलादेखील देशाच्या सीमा सुरक्षित करता आल्या असत्या. मात्र व्होट बॅंकेच्या राजकारणापुढे त्यांनी देशाला कधीच महत्त्व दिले नाही. त्यांच्याजवळ देशाच्या विकासाचे कुठलेही व्हिजन नाही. सातत्याने समाजाची दिशाभूल करून महाविकासआघाडीकडून देशात जातीपातींमध्ये वाटण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राला तर त्यांना लव्ह जिहाद व लॅंड जिहादची भूमी करायचे आहे, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी लावला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.विकास कुंभारे, आ.कृपाल तुमाने, शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महिला सुरक्षेप्रति कॉंग्रेस उदासीन
देशात व राज्यात कॉंग्रेसला अनेक वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली. मात्र देशाच्या सीमा, सुरक्षा, प्रतिके यांचे रक्षण करण्यासाठी कधीच त्यांनी पुढाकार घेतला नाही. इतकेच काय तर महिलांच्या सुरक्षेप्रतिदेखील ते कायम उदासीन राहिले. पाकिस्तानला एकाही दहशतवादी हल्ल्यानंतर थेट सवाल करण्याची हिंमत त्यांच्यात का नव्हती असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला.
खरगे खरे बोलायला घाबरतात का ?
माझ्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सातत्याने टीका करत आहेत. मात्र निजामाच्या रझाकारांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे गाव जाळले होते. त्यात त्यांची आई, मावशी आणि बहीण मरण पावले. पण, खरगे खरे बोलायला घाबरतात, कारण निजामावर आरोप केले तर मुस्लिम मते मिळणार नाहीत हेच त्यांच्या डोक्यात आहे. मतांसाठी खरगे कुटुंबाचा त्याग विसरले, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी लावला.