‘यू टर्न’ घेऊ शकतो नागपुरातील स्ट्राँग रूम व्हिडिओ प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:32 PM2019-04-02T22:32:10+5:302019-04-02T22:37:43+5:30
धंतोली येथील बचत भवन स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवताना मोबाईलने रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्यामुळेच वाढला. ही रेकॉर्डिंग उमेदवाराच्या जवळच्याच एका व्यक्तीने केली होती. या प्रकरणाचा तपास करीत असलेले पोलीस रेकॉर्डिंग करणाऱ्याला शोधत आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा शोध घेतला जात आहे. तो सापडल्यास हे प्रकरण ‘यू टर्न’ होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली येथील बचत भवन स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवताना मोबाईलने रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्यामुळेच वाढला. ही रेकॉर्डिंग उमेदवाराच्या जवळच्याच एका व्यक्तीने केली होती. या प्रकरणाचा तपास करीत असलेले पोलीस रेकॉर्डिंग करणाऱ्याला शोधत आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा शोध घेतला जात आहे. तो सापडल्यास हे प्रकरण ‘यू टर्न’ होण्याची शक्यता आहे.
२७ मार्च रोजी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी बचत भवनमध्ये ईव्हीएम मशीन ठेवतांना सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप केला होता. पटोले आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी हे षड्यंत्र असल्याचे म्हटले होते. त्यांनी यासंदर्भात मोबाईल रेकॉर्डिंग दाखवत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे तक्रारही केली होती. यानंतर या प्रकरणाने जोर पकडला. विकास ठाकरेंच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप स्पष्टपणे खारीज केला. त्यावेवळी स्ट्राँग रूमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. स्क्रिन बंद असणे म्हणजे कॅमेरा बंद आहे, असे होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
आतापर्यंतच्या पोलीस तपासात या प्रकरणाची खरी माहिती पुढे येत आहे. सूत्रानुसार घटनेच्या दिवशी २७ मार्च रोजी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.४० वाजतादरम्यान स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते. या दरम्यान तिथे तैनात पोलीस दलाने स्ट्राँग रूमचा कार्यभार जिल्हा प्रभारीला सोपविला होता. पोलीस कर्मचारी केवळ सुरक्षा व्यवस्था सांभाळत होते. ईव्हीएम ठेवण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधीला बोलावण्यात आले होते.
प्रतिनिधींमध्ये सहभागी असलेल्या एका युवकास टीव्हीवरील स्क्रीन बंद असल्याचे आढळून येताच त्याने मोबाईलने रेकॉर्डिंग केली. सूत्रानुसार युवकास मोबाईलने रेकॉर्डिंग करताना पाहून एका पोलीस कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्या अधिकाऱ्याने याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्याची भूमिका पाहता पोलीस कर्मचारीही शांत बसला. विकास ठाकरे यांनी तक्रार केल्यावर या प्रकरणाने जोर धरला.
२९ मार्च रोजी ज्या पद्धतीने तक्रार दाखल करण्यात आली, त्यामुळे पोलीसही हादरले. या तक्रारीुसार पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केली. दुसऱ्या दिवशी ३० मार्च रोजी पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तहसीलदारांनी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार ५.५५ वाजताची ही घटना असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा स्ट्राँग रूमची जबाबदारी प्रभारींकडे होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईल रेकॉर्डिंग होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली तेव्हा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी (प्रभारी) तातडीने कारवाई करू शकले असते. त्यांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्यानेच प्रकरण वाढले.
पोलिसांनी गोळा केले पुरावे
सूत्रानुसार पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित अनेक पुरावे गोळा केले आहेत. या माध्यमातून खरी बाजू समोर येऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी काही लोकांचे बयाण सुद्धा नोंदवून घेतले आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकत आहे. पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्यास त्यांची बोलती बंद होईल, असा पोलिसांना विश्वास आहे.