मेयो : डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:12 AM2019-02-08T00:12:39+5:302019-02-08T00:13:35+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) प्रवेशावरून सुरक्षारक्षक आणि नातेवाईक यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले. गुरुवारी हा संप कायम राहिल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. नियोजित शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्याने याचा फटका रुग्णांना बसला. सुरक्षेवर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मार्डचे पदाधिकारी अधिष्ठाता कक्षात ठाण मांडून होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) प्रवेशावरून सुरक्षारक्षक आणि नातेवाईक यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले. गुरुवारी हा संप कायम राहिल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. नियोजित शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्याने याचा फटका रुग्णांना बसला. सुरक्षेवर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मार्डचे पदाधिकारी अधिष्ठाता कक्षात ठाण मांडून होते.
निवासी डॉक्टरांनीच रुग्ण व नातेवाईकांसाठी पास प्रणाली सुरू केली. यामुळे एका पासवर एक रुग्ण व जास्तीत जास्त दोन नातेवाईक सोडण्याचा नियम घालून दिला. आपात्कालीन विभाग असो की वॉर्ड, हा नियम सर्वांसाठी आहे. आदेशानुसार सुरक्षारक्षक याचे सक्तीने पालनही करतात. मात्र यामुळे अनेकवेळा तणावाची स्थिती निर्माण होते. गेल्या महिन्यात यावरूनच तीन वेळा सुरक्षारक्षकांना लक्ष्य केले. बुधवारी पुन्हा ही घटना घडली. जबरदस्तीने अपात्कालीन विभागात शिरत शिवीगाळ केली, सुरक्षारक्षकांवर हातही उगारला. काही वेळानंतर शंभरावर नातेवाईकांचा जमाव आला आणि सुरक्षारक्षकांच्या अंगावर धावून गेले. मेयोचे प्रवेशद्वार बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यात डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले. या संपाला सामूहिक सुटी असे नाव देत २५० वर निवासी डॉक्टरांनी गुरुवारीही काम बंद आंदोलन कायम ठेवले.
संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न
मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी गुरुवारी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी तातडीने मेडिकल कौन्सिलची बैठक घेतली. परंतु मार्ग निघाला नाही. मेयो प्रशासनाने पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली. मेयोत पोलीस चौकी सुरू करावी, पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि बंदुकधारी पोलीस तैनात करावा या मागणीवर निवासी डॉक्टर अडून बसले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी याला मंजुरी दिली आहे. मात्र मार्डचे पदाधिकारी लेखी उत्तरावर अडून बसल्याने संपाचा तिढा कायम आहे.
कामावर परतण्याचे दिले पत्र
अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी संपात सहभागी झालेल्या निवासी डॉक्टरांना तातडीने कामावर परतण्याचे पत्र दिले. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आश्वासनही देण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही संप कायम आहे. यामुळे कामावर तातडीने परतण्याचे पत्र दिले आहे. संप नियमाला धरून नसल्याचेही ते म्हणाले.