मेयो : शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका टळणार! नेत्ररोग विभागाचे तीन शस्त्रक्रिया गृह होणार ‘मॉड्युलर’
By सुमेध वाघमार | Published: July 19, 2024 07:18 PM2024-07-19T19:18:32+5:302024-07-19T19:20:23+5:30
गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. मेडिसीनपासून ते गायनिक विभागापर्यंतचे सहा विभाग एकाच इमारतीत असणाऱ्या ५००बेडच्या ‘मेडिसीन युनिट’च्या कामाला सुरुवात झाली आहे.
नागपूर : इंदीरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) विकासात आणखी एक भर पडणार आहे. शासनाने नेत्ररोग विभागाच्या तीन शस्त्रक्रिया गृह ‘माड्यूलर’ करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी १० कोटी २ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. ‘मॉड्यूलर’ शस्त्रक्रिया गृहामुळे शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका पूर्णत: टळणार आहे.
गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. मेडिसीनपासून ते गायनिक विभागापर्यंतचे सहा विभाग एकाच इमारतीत असणाऱ्या ५००बेडच्या ‘मेडिसीन युनिट’च्या कामाला सुरुवात झाली आहे. ‘ओपीडी’चे नतुनीकरण झाल्याने रुग्णांना याचा फायदा होत आहे. या शिवाय, सर्जिकल कॉम्प्लेक्सचे दोन मजल्यांचे बांधकाम, रुग्णालयातील सांडपाण्याची व व्यवसायीक ‘इन्फल्यूअंट’च्या निचऱ्यासाठी पाईप लाईनची प्रक्रियेचा (ईटीपी/एसटीपी) प्रकल्प, मुला-मुलींचे वसतीगृह, लाँड्री प्लांटचे नुतनीकरण, अग्निशमन यंत्रणा व क्रीडा मैदानाचा विकास लवकरच होऊ घातला आहे. आता तीन शस्त्रक्रिया गृहांना ‘मॉड्यूलर’करण्याचा प्रस्तावाला गुरुवारी प्रशासकीय मंजूरी मिळाल्याने पुढील दोन वर्षात मेयोचे बदलेले स्वरुप दिसणार आहे.
-सर्जरी, आॅर्थाेपेडिक, ईएनटीचे मॉड्यूलर शस्त्रक्रिया गृह
मेयोमधील सर्जरी, आॅर्थाेपेडिक विभागाचे शस्त्रक्रिया गृह यापूर्वीच ‘मॉड्यूलर’ झाले आहे. ईएनटी विभागाचा शस्त्रक्रिया गृहाचे काम सुरू आहे. गुरुवारी नेत्ररोग विभागाच्या तीन शस्त्रक्रिया गृहांना ‘मॉड्यूलर’ करण्याला मंजुरी मिळाली आहे. प्रत्येक शस्त्रक्रिया गृहाचा बांधकामासाठी २ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय, रिकव्हरी रुम, पॅसेज ंआणि आवश्यक यंत्र सामूग्रीसाठी १ कोटी ३२ लाख ८० हजार ९३० रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
-मेयोच्या विकासात भर
मेयोतील तीन शस्त्रक्रिया गृह ‘मॉड्यूलर’ करण्यास परवानगी मिळाल्याने रुग्णालयाच्या विकासात भर पडणार आहे. तीन शस्त्रक्रिया गृहाचे काम सुरू होणार असलेतरी शस्त्रक्रिया बंद राहणार नाहीत. दुसऱ्या विभागाचा शस्त्रक्रिया गृहात या शस्त्रक्रिया केल्या जातील. ‘मॉड्यूलर शस्त्रक्रिया गृहामुळे संसर्गाचा धोका आणखी कमी होईल. रुग्णांसोबतच डॉक्टरांना याचा मोठा लाभ होईल.
-डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता मेयो