मेयोतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे; सफाई कामे प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:36 PM2020-04-09T22:36:39+5:302020-04-09T22:37:17+5:30
दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयातील (मेयो) २०० वर सफाई कर्मचारी गुरुवार सकाळपासून संपावर गेले होते. मेयोेचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी स्थानिक कोषातून निधी देण्याची तयारी दर्शविल्याने रात्री ८ वाजताच्या सुमारास संप मागे घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयातील (मेयो) २०० वर सफाई कर्मचारी गुरुवार सकाळपासून संपावर गेले होते. कोरोना पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाने सफाईची कामे प्रभावित झाली होती. संपाची महिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना मिळताच त्यांनी यात पुढाकार घेतला, तर मेयोेचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी स्थानिक कोषातून निधी देण्याची तयारी दर्शविल्याने रात्री ८ वाजताच्या सुमारास संप मागे घेण्यात आला.
मेयोत सफाई कर्मचाऱ्यांची ३२१ पैकी १२४ पदे रिक्त आहेत. रुग्णालयाच्या वाढत्या विभागांमुळे कर्मचारी कमी पडतात. यामुळे शासनाने सफाई कामाचे आऊटसोर्सिंग करीत ‘बीव्हीजी’ या खासगी कंपनीला कंत्राट दिले. २०० कर्मचाऱ्यांच्या ताफ्यामुळे मेयोच्या स्वच्छतेत भर पडली. या कंपनीला दरमहा ४५ लाख रुपये मेयोला द्यावे लागतात. परंतु गेल्या वर्षी शासनाकडून ६० टक्केच निधी मिळाल्याने व उर्वरित निधीसाठी शासनाकडे पुरवणी मागणी करूनही तो मिळाला नाही. परिणामी, चार महिन्यांचे वेतन थकले. विशेष म्हणजे, अशा प्रसंगी संबंधित कंपनीकडून तीन महिन्यांचे वेतन देण्याचा नियम आहे. त्यानुसार कंपनीने दोन महिन्यांचे वेतन दिल्याचे समजते. उर्वरित दोन महिन्यांच्या वेतनासाठी कर्मचारी आजपासून आंदोलनाला बसले.
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णालय अडचणीत आले आहे. कर्मचाऱ्यांच्या मते, ‘लॉकडाऊन’ असल्याने घरातील कमावत्या व्यक्तीच्या हाताला काम नाही. आम्हाला दोन महिन्यापासून वेतन नाही. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे नाईलाजाने कामबंद आंदोलन करावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. संपामुळे रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी मेयोच्या स्थानिक कोषातून दोन महिन्याचे वेतन देण्याची तयारी दर्शवली. संपाची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांना मिळताच त्यांनी यात पुढाकार घेऊन कोषागार विभागाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिल्यावर त्यांनी संप मागे घेतला.
-स्थानिक कोषातून वेतन देणार
निधीअभावी सफाई कंपनीचे बिल थकले आहे. याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. स्थानिक कोषातून त्यांना वेतन दिले जाणार आहे. सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होणार असल्याने त्यांनी रात्री संप मागे घेतला.
-डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो