मेयो : जन्मजात मूकबधिर २७ चिमुकले बोलू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:20 PM2019-12-23T22:20:48+5:302019-12-23T22:25:11+5:30
मेयोच्या ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागात आतापर्यंत ३२ चिमुकल्यांवर या इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील २७ चिमुकल्यांना ‘स्पीच थेरपी’चे प्रशिक्षण देऊन बोलते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रवणदोष असल्याने त्या चिमुकल्यांना जन्मापासून ऐकू येत नव्हते. त्यांनी जगातला कोणताच आवाज ऐकला नव्हता. यामुळे त्यांना बोलताही येत नव्हते. यावर प्रभावी असणारे महागडे ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ खरेदी करणेही शक्य नव्हते. अशा रुग्णांची दखल मेयोच्या ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी घेतली. त्यांनी स्वत: या शस्त्रक्रियेचे कौशल्य आत्मसात केले, आणि शासनाच्या मदतीने विभागात कॉक्लीअर इम्प्लांट केंद्र सुरू केले. आतापर्यंत ३२ चिमुकल्यांवर या इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील २७ चिमुकल्यांना ‘स्पीच थेरपी’चे प्रशिक्षण देऊन बोलते करण्यात आले. शनिवारी पुन्हा पाच बालकांवर कॉक्लीअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली.
जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ईएनटी विभागात कॉक्लीअर इम्प्लांट केंद्र डॉ. वेदी यांनी २०१७ मध्ये सुरू केले. हे केंद्र सुरू करणारे विदर्भातील शासकीय रुग्णालयात मेयो पहिले रुग्णालय ठरले. या केंद्राचा फायदा गरजुंना होऊ लागला आहे. सुरूवातीला चार रुग्णांवर यशस्वी ‘इम्प्लांट’ केल्यानंतर पुढे हा आकडा वाढतच जात आहे. शनिवार २२ डिसेंबर रोजी पुन्हा पाच बालकांवर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ करण्यात आले. आतापर्यंत ३२ मुलांवर ही शस्त्रक्रिया झाली आहे. शनिवारी झालेली शस्त्रक्रिया पद्मश्री डॉ. मिलिंद किर्तने यांच्या देखरेखीखाली डॉ. वेदी, डॉ विपिन ईखार व ईएनटी विभागातील चमू यांनी केली. शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याची जबाबदारी डॉ शीतल दलाल, डॉ रामतानी व चमू यांनी पार पाडली. अधिष्ठाता डॉ अजय केवलिया व वैद्यकीय अधीक्षक डॉ संध्या मांजरेकर यांनी इम्प्लांट चमूचे कौतुक केले. या केंद्राचा लाभ जास्तीत गरजू लोकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. वेदी यांनी केले आहे.