मेयोने दिला मुक्या भावनांना स्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:28 AM2019-02-03T00:28:52+5:302019-02-03T00:29:49+5:30
जन्मजात श्रवणदोष असलेल्या चिमुकल्यांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने चार मुक्या भावनांना स्वर मिळाले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘ईएनटी’ विभागाच्या पुढाकारामुळे आतापर्यंत १७ बालकांचे श्रवणदोष दूर करून पुढे आयुष्यात येणारी मूकबधिरता दूर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्मजात श्रवणदोष असलेल्या चिमुकल्यांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने चार मुक्या भावनांना स्वर मिळाले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘ईएनटी’ विभागाच्या पुढाकारामुळे आतापर्यंत १७ बालकांचे श्रवणदोष दूर करून पुढे आयुष्यात येणारी मूकबधिरता दूर केली.
जन्मणाऱ्या १०० मुलांपैकी साधारण चार मुलांना जन्मजात श्रवणदोष असतो. त्यांच्यावर उपचार होईस्तोवर ते बोलू किंवा ऐकू शकत नाहीत. या मुलांसाठी ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. एक छोटे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे मुलाच्या कानात लावले जाते. यामुळे श्रवणदोषासोबतच मूकबधिरपण टाळता येते. ही शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने आतापर्यंत गरीब रुग्ण यापासून दूर रहायचे. मेयोच्या कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी पुढाकार घेत ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ केंद्र सुरू केले. केंद्र सरकारच्या ‘स्किम ऑफ असिस्टन्स टू डिसेबल पर्सनस फॉर परचेस’चा (एडीआयपी) फायदा या केंद्राला झाला. त्यांच्या मदतीमुळेच गरीब व गरजू रुग्णांवर ही शस्त्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत १७ रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करून ‘स्पीच’ आणि ‘लँग्वेज थेरपी’ सुरू केल्याने आता या मुलांना बोलता येऊ लागले आहे.
शनिवार २ फेब्रुवारी रोजी निवड केलेल्या चार मुलांवर पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांच्या मार्गदर्शनात पुन्हा ही शस्त्रक्रिया डॉ. जीवन वेदी, डॉ. विपीन ईखार, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. सोनाली खोब्रागडे व डॉ. विकास चौधरी यांनी यशस्वी पार पडली. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या नेतृत्वात पाच वर्षीय यश वालथरे, चार वर्षीय मृणाल शेंडे, पाच वर्षीय साची देशपांडे व सुजल ठाकरे या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.