कोरोना विषाणूच्या निदानाची जबाबदारी मेयोकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 09:14 PM2020-01-31T21:14:04+5:302020-01-31T21:15:23+5:30
कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी राज्यात सहा केंद्र उघडण्यात आले आहे. यात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) समावेश करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी राज्यात सहा केंद्र उघडण्यात आले आहे. यात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) समावेश करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या मायक्रोबायलॉजी विभागाकडे याची जबाबदारी देण्यात आली असून तूर्तास तरी एकही नमुना आला नसल्याची माहिती आहे.
कोरोना विषाणूची दहशत आता भारतातही पसरली आहे. केरळमध्ये या विषाणूचा पहिल्या रुग्णांची नोंद झाल्याने सर्वच शासकीय रुग्णालयांना ‘अलर्ट’ करण्यात आले आहे. नागपुरातील ३५ वर्षीय व्यावसायिक चीनमध्ये जाऊन आल्यानंतर त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास वाढल्याने संशयित रुग्ण म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. त्याला मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ दाखल केले असून उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस संशयित रुग्णाची वाढती संख्या पाहता आजाराच्या निदानासाठी राज्यात सहा नोडल सेंटर तयार करण्यात आले आहे. यात मेयोचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या संशयित स्वाईन फ्लू रुग्णांच्या नमुनेही केवळ मेयोच्या मायक्रोबायलॉजी विभागातच तपासले जातात. सध्यातरी संशयित कोरोना विषाणू रुग्णाचा एकही नमुना आला नसल्याची माहिती विभागाचे डॉ. राऊत यांनी दिली.
रसायन मिळाल्यास कोरोना विषाणूची तपासणी
मेयोचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या आजाराच्या निदानासाठी नोडल सेंटर म्हणून मेयोचा समावेश करण्यात आला आहे. येथील मायक्रोबायलॉजी विभागाकडे ‘पॉलिमर्स चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) यंत्र उपलब्ध आहे. परंतु कोरोना विषाणूच्या तपासणी लागणारे रसायन सध्यातरी उपलब्ध नाही. पुढील दोन-तीन दिवसात पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतून हे रसायन उपलब्ध झाल्यास येथेच तपासणी होऊन आजाराचे निदान केले जाईल. तोपर्यंत आलेले नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील.
त्या संशयित रुग्णाची प्रकृती स्थिर
मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या उपचारासाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात पाच सदस्यीय समिती तयार केली आहे. मेडिकलमध्ये गुरुवारी पहिला संशयित रुग्ण दाखल झाला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून नमुन्याचा अहवाल शनिवार किंवा सोमवारी येण्याची शक्यता आहे.