अवयवदानात मेयो इस्पितळाचीही पडणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:39 PM2018-03-15T22:39:59+5:302018-03-15T22:40:28+5:30

अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणजे मेंदूमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला आरोग्य विभागाने अखेर बुधवारी मंजुरी दिली आहे. या सेंटरसाठी रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

Mayo hospital will also be added in organ donation | अवयवदानात मेयो इस्पितळाचीही पडणार भर

अवयवदानात मेयो इस्पितळाचीही पडणार भर

googlenewsNext
ठळक मुद्देआॅर्गन रिट्रायव्हल सेंटरला मिळाली मंजुरी : न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणजे मेंदूमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला आरोग्य विभागाने अखेर बुधवारी मंजुरी दिली आहे. या सेंटरसाठी रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.
आज भारतात हजारो लोक अवयव दानासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. देशभरात सुमारे पाच लाख रुग्ण मूत्रपिंड, ५० हजार रुग्ण यकृत आणि दोन हजाराहून अधिक रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे शासनाकडून अवयवदान चळवळीची व्यापक जनजागृती व चोख व्यवस्थापन होणे महत्त्वाचे झाले आहे. अवयवदानाचे महत्त्व ओळखत मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी पुढाकार घेत ‘एनटीओआरसी’चा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला घेऊन आरोग्य विभागाच्या चमूने गेल्याच आठवड्यात रुग्णालयाची पाहणी करून १४ मार्च रोजी मंजुरी दिली.
 काय आहे ‘एनटीओआरसी’
अपघातात डोक्याला मार लागल्याने, मेंदूत रक्तस्राव झाल्याने किंवा मेंदूला कायमस्वरूपी इजा झाल्याने त्या व्यक्तीचा मेंदू मृत (ब्रेन डेड) होऊ शकतो. अशावेळी कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर (व्हेंटिलेटर) त्या व्यक्तीला ठेवून इतर अवयवांचे कार्य सुरू ठेवले जाते. एखादा रुग्ण ‘ब्रेन डेड’ घोषित झाल्यानंतर, त्याचे अवयव इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपीत करण्यासाठी अवयव काढण्याच्या मंजुरीप्राप्त विभागाला ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ म्हटले जाते.
रस्ता अपघातात वर्षाला ५०० वर ब्रेनडेड रुग्ण
डॉ. व्यवहारे म्हणाले, मेयोमध्ये वर्षाला सुमारे १८०० शवविच्छेदन होतात. यात रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेले ९०० रुग्ण असतात. यातील साधारण ५०० वर रुग्ण ‘ब्रेन डेड’ असतात. ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यासाठी तज्ज्ञाची समिती असते. त्यांच्या मंजुरीनंतर व रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाला परवानगी दिल्यावरच अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू होते.
एक मेंदूमृत व्यक्ती १० रुग्णांंना जीवनदान देऊ शकते
मेंदूमृत दात्याला हृदय, हृदयाच्या झडपा, फुफ्फुस, मूत्रपिंड, त्वचा, डोळे, यकृत, स्वादूपिंड, आतडी, कानाचे ड्रम आदी अवयव दान करता येतात. यामुळे एक मेंदूमृत व्यक्ती साधारण १० रुग्णांना जीवनदान देऊ शकतो. यामुळे मेयोतील ‘एनटीओआरसी’चे महत्त्व वाढणार आहे.
-डॉ. मकरंद व्यवहारे
विभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग

Web Title: Mayo hospital will also be added in organ donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.