मेयो रुग्णालयात लागणार ट्रूनॅट यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:14 AM2020-05-19T00:14:20+5:302020-05-19T00:20:17+5:30
मेयो रुग्णालय हे कटेन्मेंट झोनच्या फार जवळ आहे. परिणामी, या भागातून सर्वाधिक रुग्ण रुग्णालयात येतात. अनेक संशयित रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे अशा रुग्णांचे किंवा संशयित मृतदेहाचे तातडीने नमुने तपासणे गरजेचे ठरते. यासाठी मेयो प्रशासनाने आरोग्य विभागाकडे ट्रूनॅट यंत्राची मागणी केली असून मंजुरीही मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयो रुग्णालय हे कटेन्मेंट झोनच्या फार जवळ आहे. परिणामी, या भागातून सर्वाधिक रुग्ण रुग्णालयात येतात. अनेक संशयित रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे अशा रुग्णांचे किंवा संशयित मृतदेहाचे तातडीने नमुने तपासणे गरजेचे ठरते. यासाठी मेयो प्रशासनाने आरोग्य विभागाकडे ट्रूनॅट यंत्राची मागणी केली असून मंजुरीही मिळाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. विशेषत: मोमिनपुरा, सतरंजीपुरा, टिमकी या भागात आतापर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. येथील रुग्णांना मेयो जवळ पडत असल्याने कधीही रुग्ण उपचारासाठी येतात. विशेषत: अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणाऱ्यांना पीपीई किट दिली असली तरी त्यानंतर तो रुग्ण इतर वॉर्डात जात असल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता असते. रविवारी मृत्यू झालेल्या ५८ वर्षीय संशयित महिलेच्या बाबतीत असेच झाले. या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवल्यानंतर तिचा मृत्यू झाला. आज नमुना पॉझिटिव्ह आल्याने तिच्या संपर्कात आलेले डॉक्टर, परिचारिका व अटेन्डंटला क्वारंटाइन व्हावे लागले. यापूर्वीही असाच प्रकार झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन असे प्रकरण वाढणार आहेत. यामुळे संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्यासाठी मेयो प्रशासनाने आरोग्य विभााकडे ट्रूनॅट यंत्राची मागणी केली. या यंत्रामुळे तासाभरात चाचणीचा अहवाल मिळतो. यामुळे रुग्णावर उपचार करणे सोपे होणार आहे.
सीबी नॅट यंत्राचीही मागणी
संशयित रुग्णांची तातडीने चाचणी करण्यासाठी ट्रूनॅट यंत्राची मदत घेतली जाणार आहे. लवकरच हे यंत्र मेयोत स्थापन होईल. या यंत्रासोबत सीबी नॅट यंत्राची मागणी उपसंचालक आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.
-डॉ. रवी चव्हाण
उपसंचालक, आरोग्य विभाग