मेयोचा भारही सुतिकागृहावर

By admin | Published: May 1, 2017 01:20 AM2017-05-01T01:20:07+5:302017-05-01T01:20:07+5:30

महापालिकेच्या पाचपावली येथील सुतिकागृहात आधीच डॉक्टर व परिचारिकांची वानवा आहे.

Mayo loads on the bedroom | मेयोचा भारही सुतिकागृहावर

मेयोचा भारही सुतिकागृहावर

Next

अ‍ॅन्टीरेबीज लसीकरणाचा अतिरिक्त बोजा : अपुऱ्या मनुष्यबळात कशी होणार सेवा
गणेश हूड/आनंद डेकाटे नागपूर
महापालिकेच्या पाचपावली येथील सुतिकागृहात आधीच डॉक्टर व परिचारिकांची वानवा आहे. उपलब्ध सुविधांमध्ये रुग्णांना चांगली सेवा देण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत आहेत. आवश्यक सुविधा उपलब्ध करणे तर दूरच उलट येथील डॉक्टरांवर अतिरिक्त कामांचा बोजा टाकला जात असल्याचे चित्र आहे. अ‍ॅन्टीरेबीज लसीकरणाची येथे सुविधा उपलब्ध आहे. परंतु ही सुविधा उपलब्ध करतानाच मेयोतील रुग्णांनाही येथे लसीकरणासाठी पाठविले जाते. त्यामुळे या छोटेखानी रुग्णालयावर मेयोतील रुग्णांचाही अतिरिक्त भार वाढला आहे.
नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी मोकाट कुत्र्यांनी चावा घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अ‍ॅन्टीरेबीज लस घेणे आवश्यक असते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, रेबीज हा अतिशय तीव्र स्वरूपाचा विषाणूजन्य प्राणघातक रोग आहे. रेबीज हा पशुजन्य संक्रमित आजार आहे. हा रोग प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही कुत्रा चावल्यामुळे होतो. रोगाची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना करणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे अ‍ॅन्टीरेबीज लस महापालिकेच्या इतर रुग्णालयाप्रमाणे पाचपावली सुतिकागृहातही उपलब्ध करण्यात आली आहे. अशीच व्यवस्था मेयो रुग्णालयात उपलब्ध असल्यास या रुग्णालयावरील भार कमी होईल.
सुतिकागृहात मनुष्यबळाची कमतरता आहे. येथे एकूण २६ पदे मंजूर आहेत. त्यातील काही सेवानिवृत्त झाले आहेत. रुग्णालयात डॉक्टरांची सहा पदे मंजूर आहेत. परंतु केवळ तीन डॉक्टर कार्यरत आहेत. तेच संपूर्ण रुग्णालय सांभाळतात. ओपीडीतील रुग्ण पाहतात आणि तेच बाळंतपणही करतात. हे करीत असतानाच ते रेबीजचे औषधेही देत होतेच. परंतु आता मेयोतील रुग्णही येथे रेफर करणे सुरू झाले आहे. दररोज किमान २० ते २५ रुग्ण रेबीजचे असतात.


वेळेवर वेतन नाही
महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीचा फटका पाचपावली सुतिकागृहातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. कर्मचाऱ्यांना महिन्याच्या ५ तारखेपर्यंत वेतन मिळत होते. परंतु गेल्या काही महिन्यापासून वेळेवर वेतन मिळत नाही. महिना संपायला येतो तरी वेतनाची प्रतीक्षा करावी लागते. याचा कामकाजावर परिणाम होतो.

नवीन बेडची गरज
रुग्णालयातील बेड गेल्या अनेक वर्षांपासून बदलण्यात आलेले नाही. जुन्या पद्धतीचे बेड आरामदायी नसल्याने रुग्णांना उपलब्ध सेवेत समाधान मानावे लागते. येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या विचारात घेता, नवीन बेडची गरज आहे.

असामाजिक तत्त्वांचा वावर
पाचपावली सुतिकागृहाच्या गेटवर सुरक्षा गार्डसाठी उभारण्यात आलेली खोली मोडकळीस आली आहे. कूलर व पंख्याची सुविधा नाही. उन्हाळ्याच्या दिवसात उकाड्यात गार्डला बसावे लागते. येथे एकच गार्ड तैनात असतो. या परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याने रु ग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांत असुरक्षिततेची भावना आहे. येथे सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे.

रंगरंगोटीचा अभाव
महापालिका मुख्यालयातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या कक्षांची वर्ष-दोन वर्षांत रंगरंगोटी केली जाते. परंतु पाचपावली सुतिकागृहाच्या इमारतीची गेल्या अनेक वर्षांत रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. परिसरात झुडपे वाढली आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बसण्यासाठी व्यवस्थित बेंच नाही
ओपीडीमध्ये रुग्णांची गर्दी असते. तपासणीसाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी त्यांना बसण्यासाठी आरामदायी बेंच उपलब्ध करण्याची गरज आहे.उपलब्ध असलेले बेंच मोकळीस आलेले आहेत. रुग्णालयाला नवीन फर्निचरची गरज आहे.

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया
महिला व बाल रुग्णालय असल्याने येथे महिलांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासोबतच पुरुषांच्याही नसबंदीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी महाल येथील रुग्णालयातील पुरुष डॉक्टरची सेवा घेतली जाते. ते एका ठराविक दिवशी येथे येतात आणि शस्त्रक्रिया करतात.

उद्यान विभागाचे दुर्लक्ष
पाचपावली सुतिकागृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खाली जागा वापराविना पडून आहे. येथे कचरा साचतो. उद्यान विभागाने खाली जागेत हिरवळ निर्माण केल्यास सुशोभिकरणामुळे वातावरण प्रसन्न राहील. परंतु महापालिकेच्या उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.
 

Web Title: Mayo loads on the bedroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.