मेयो, मेडिकलचे ३५० डॉक्टर्स मंगळवारपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:33 PM2021-05-03T23:33:40+5:302021-05-03T23:35:50+5:30
Doctors on strike इन्टर्न डॉक्टरांना ५० हजार रुपये मानधन देण्याच्या मागणीसाठी राज्यातील तीन हजार इन्टर्न डॉक्टरांनी उद्या, मंगळवारपासून संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात नागपुरातील मेयो, मेडिकलमधील ३५० इन्टर्न डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. यामुळे कोरोनाचे रुग्ण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इन्टर्न डॉक्टरांना ५० हजार रुपये मानधन देण्याच्या मागणीसाठी राज्यातील तीन हजार इन्टर्न डॉक्टरांनी उद्या, मंगळवारपासून संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात नागपुरातील मेयो, मेडिकलमधील ३५० इन्टर्न डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. यामुळे कोरोनाचे रुग्ण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांसाठी असलेले वॉर्ड फुल्ल आहेत. सर्वच विभागातील डॉक्टरांची ड्युटी कोविडमध्ये लावण्यात आली आहे. त्यांच्या हाताखाली इन्टर्न डॉक्टरांना देण्यात आले आहे. परंतु आता हे डॉक्टर संपावर जाणार असल्याने वरिष्ठ डॉक्टरांवर कामाचा ताण पडण्याची शक्यता आहे.
मेडिकलचे इन्टर्न डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. शुभम नागरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पुणे व मुंबईच्या इन्टर्न डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या सोयी राज्यातील इतर इन्टर्न डॉक्टरांना मिळत नाहीत, त्याकडे लक्ष वेधावे व विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. यात मागीलवर्षी कोविड ड्युटीमध्ये मुंबई व पुण्याच्या इन्टर्नना ५० हजार रुपये मानधन मिळाले होते. हे मानधन राज्यातील सर्व इन्टर्न डॉक्टरांना देण्यात यावे. ३०० रुपये प्रति दिवस जेवण, प्रवास व प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात यावा, कोविड ड्युटीनंतर क्वारंटाईन होण्याची सोय असावी, आजारी पडल्यास उपचाराची जबाबदारी शासनाने उचलावी, शासनाचे विमा कवच प्रदान करावे, आदी मागण्या आहेत. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मेडिकलमधील २००, तर मेयोमधील १५०, असे एकूण ३५० डॉक्टर्स या संपात सहभागी होणार आहेत.