मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांचा संप मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:36 AM2019-08-09T00:36:47+5:302019-08-09T00:37:34+5:30

राज्यातील पूरस्थिती, त्यामुळे बळावणारे साथीचे आजार व विद्यावेतन वाढीचा निर्णय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आल्याने निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने रुग्णहित विचारात घेऊन गुरुवारी बेमुदत संप मागे घेतला.

Mayo, medical doctor's back end | मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांचा संप मागे

मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांचा संप मागे

googlenewsNext
ठळक मुद्देअन्यथा पुन्हा संप : विद्यावेतन वाढीसाठी ३१ तारखेपर्यंतची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील पूरस्थिती, त्यामुळे बळावणारे साथीचे आजार व विद्यावेतन वाढीचा निर्णय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आल्याने निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने रुग्णहित विचारात घेऊन गुरुवारी बेमुदत संप मागे घेतला. परंतु ३१ ऑगस्टपर्यंत विद्यावेतन वाढीसह इतरही मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला. संप मिटल्याने मेयो, मेडिकल रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन, विद्यावेतनात पाच हजाराने वाढ, क्षयरोग झालेल्या डॉक्टरांना सुटी व प्रसुती रजा देण्याची मागणी लावून धरत बुधवारी राज्यातील सर्व निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले होते. संपाचा फटका सामान्य रुग्णांना बसला. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात वरिष्ठ डॉक्टर असलेतरी वॉर्डातील रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत होते. काही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया झाल्या. नियमबाह्य हा संप असल्याने शासनस्तरावर ‘मार्ड’वर ‘मेस्मा’ लावण्यात आला. मेयो, मेडिकलच्या ‘मार्ड’ पदाधिकाऱ्यांना या संदर्भात नोटीसही बजावण्यात आल्या.
विशेष म्हणजे, संपाच्या एक दिवसापूर्वी मेडिकलमधील निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांचे प्रलंबित विद्यावेतन तिजोरीत जमा झाले. बुधवारी डॉक्टरांच्या मागण्यांना घेऊन सेंट्रल मार्डसोबत वैद्यकीय शिक्षण संचालकांची बैठक झाली. यात पाच हजार रुपयांनी विद्यावेतन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात पाठविण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिवाय, क्षयरोगबाधित डॉक्टरांना पगारी सुटी व महिला डॉक्टरांना प्रसुती रजा मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे तसेच राज्यभरातील पूरस्थिती व त्यामुळे वाढणारे साथीचे आजार लक्षात घेऊन ‘मार्ड’ने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. सोबतच ३१ ऑगस्टपर्यंत वाढीव विद्यावेतन व इतरही मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा संप पुकारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. संप मागे घेताच मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टर गुरुवारी सकाळी ८ वाजताच आपापल्या ड्युटीवर रुजू झाले. यामुळे मेयो, मेडिकलचा कारभार सुरळीत सुरू झाला.

 

Web Title: Mayo, medical doctor's back end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.