मेयो, मेडिकल : औषधांच्या तुटवड्याने रुग्ण वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:24 PM2019-06-03T22:24:21+5:302019-06-03T22:25:34+5:30
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन महामंडळाला देऊन दीड वर्षे झालीत. परंतु अद्यापही या महामंडळाकडून पुरवठा सुरळीत झालेला नाही. मेयो, मेडिकलमध्ये तर जुन्या मागणीनुसार आतापर्यंत केवळ ५० ते ६० टक्केच औषधांचा पुरवठा झाला आहे. परिणामी, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन महामंडळाला देऊन दीड वर्षे झालीत. परंतु अद्यापही या महामंडळाकडून पुरवठा सुरळीत झालेला नाही. मेयो, मेडिकलमध्ये तर जुन्या मागणीनुसार आतापर्यंत केवळ ५० ते ६० टक्केच औषधांचा पुरवठा झाला आहे. परिणामी, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
औषधी व वैद्यकीय उपकरणांचे दर आणि मानके यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी व दर्जा व गुणवत्ता सुधारण्यास मदत होण्यासाठी औषधे व यंत्रसामुग्री खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने जुलै २०१७ रोजी घेतला. राज्यातील प्रत्येक मेडिकलला औषधे व साहित्य खरेदीचा निधी ‘हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉपोर्रेशन लिमिटेड’कडे वळता करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) औषधांसाठी सुमारे ४ कोटी, जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेला १० कोटी, कर्करोगाच्या यंत्रसामुग्रीचा २२ कोटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी असलेले २५ कोटी रुपये असे एकूण साधारण ६१ कोटी रुपये हाफकिनकडे वळते केले. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) यंत्र सामुग्रीचे दोन कोटी, औषधे व साहित्याचे दोन कोटी व एमआरआय, सिटीस्कॅनचे २५ कोटी असे एकूण साधारण २९ कोटी रुपये हाफकिन कंपनीकडे वळते केले आहेत. परंतु याला आता वर्ष लोटूनही यंत्रसामुग्रीच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. औषधांबाबतही महामंडळ गंभीर नसल्याने याचा फटका रुग्णालय प्रशासनासोबतच रुग्णांना बसत आहे.
मेयो, मेडिकलमध्ये एप्रिलपासून पुरवठा नाही
मेयोने औषध खरेदीसाठी २ कोटी १० लाख तर मेडिकलने ३ कोटी ४६ लाखांचा निधी हाफकिन महामंडळाच्या तिजोरीत जमा केला आहे. परंतु गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत केवळ ५० ते ६० टक्केच औषधांचा पुरवठा झाला. यातही गेल्या एप्रिल महिन्यांपासून औषधे मिळाली नसल्याचे येथील अधिकारी सांगतात.
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डिसेंबर २०१८ पासून हाफकिन महामंडळाकडून औषधांचा पुरवठाच झालेला नाही. सूत्रानुसार, रुग्णालय प्रशासनाने १६२ औषधांची यादी महामंडळाकडे पाठविली होती. परंतु आतापर्यंत केवळ १०२ औषधी मिळाल्या आहेत. इतर औषधांसाठी रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे.
स्थानिक खरेदीचे प्रमाण वाढले
हाफकिन महामंडळाकडून औषधांचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासनाला स्थानिक स्तरावर जीवनरक्षक औषधांची खरेदी करावी लागत आहे. गेल्या वर्षभरात याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या तिन्ही रुग्णालयाच्या तिजोरीवर ताण पडला आहे.