मेयो, मेडिकललाच झाला डेंग्यू! विद्यार्थी, डॉक्टर सापडले विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 01:20 PM2021-08-02T13:20:27+5:302021-08-02T13:20:53+5:30
Nagpur News डेंग्यूच्या विळख्यात मेडिकल व मेयोतील १५ वर विद्यार्थी व निवासी डॉक्टर सापडले आहेत.
नागपूर : डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टिबायोटिक किंवा अॅण्टिव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. अशा डेंग्यूच्या विळख्यात मेडिकल व मेयोतील १५ वर विद्यार्थी व निवासी डॉक्टर सापडले आहेत.
डेंग्यूच्या साथीने नागपुरात चांगलेच थैमान घातले आहे. घराघरांत रुग्ण आढळून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, मेडिकलमध्ये डेंग्यूचे जवळपास ३०, तर मेयोमध्ये २० वर रुग्ण भरती आहेत. यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. बाह्यरुग्ण विभागात रोज ५० वर रुग्णांची नोंद होत आहे. यातच दोन्ही रुग्णालयांच्या वसतिगृहाच्या परिसरात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने, कूलरमुळे व अडगळीच्या सामानामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे उपचार करणारे निवासी डॉक्टरांवरच डेंग्यूवर उपचार घेण्याची वेळ आली आहे. सध्या मेयोमध्ये पाच तर मेडिकलमध्ये सात निवासी डॉक्टरांना भरती करण्यात आले आहेत. याशिवाय, वसतिगृहात उपचार घेणाऱ्या डॉक्टरांची संख्या वेगळी आहे.
-बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
मेयो व मेडिकल वसतिगृहाच्या देखभालीची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. परंतु त्यांच्याकडून देखभाल होत नसल्याची विद्यार्थी व निवासी डॉक्टरांच्या तक्रारी आहेत. संथ गतीचे व अर्धवट बांधकाम, जागोजागी पडून असलेले बांधकाम साहित्य, ड्रेनेज लाइनची झालेली दुरवस्था यामुळे पाणी साचून डासांच्या उत्पत्तीचे केंद्र ठरत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.