मेयो, मेडिकलमध्ये वाढली कोरोनाबाधितांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:02+5:302021-02-23T04:11:02+5:30

नागपूर : मागील दोन दिवसात ७००वर गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या रविवारी ६००वर आली. आज ६२६ नव्या रुग्णांची भर पडली, तर ...

Mayo, Medical Increased Corona Infections | मेयो, मेडिकलमध्ये वाढली कोरोनाबाधितांची संख्या

मेयो, मेडिकलमध्ये वाढली कोरोनाबाधितांची संख्या

Next

नागपूर : मागील दोन दिवसात ७००वर गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या रविवारी ६००वर आली. आज ६२६ नव्या रुग्णांची भर पडली, तर आठ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या १,४३,१३३ झाली असून, मृतांची संख्या ४२७५वर पोहोचली आहे. मागील आठवड्यात रुग्णांची संख्या वाढल्याने मेयो, मेडिकल व एम्समध्ये रुग्णाची संख्या वाढली आहे. मेयो व एम्समध्ये प्रत्येकी १००, तर मेडिकलमध्ये १०२ रुग्ण उपचाराखाली आहेत.

नागपूर जिल्ह्यात शनिवारी चाचण्यांची संख्या नऊ हजारांवर गेली. मागील पाच महिन्यातील चाचण्यांच्या संख्येतील उच्चांक होता. परंतु रविवारी घट आली. ६३३५ चाचण्या झाल्या. यात ४६३० आरटीपीसीार, तर १७०५ अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. कमी चाचण्यांमुळे बाधितांची नोंदही कमी झाल्याचे बोलले जात आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील ५५१, ग्रामीणमधील ७२, तर जिल्हाबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील चार, ग्रामीणमधील एक, तर जिल्हाबाहेरील तीन मृत्यू आहेत. ५९९७ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमधून ४३८५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने मेयो, मेडिकल व एम्समध्येही रुग्ण वाढू लागले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी मेयो, मेडिकलमध्ये प्रत्येकी ७०, तर एम्समध्ये २५वर रुग्ण नव्हते. परंतु आता या तिन्ही रुग्णालयात १००वर रुग्ण भरती आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

-४५५ रुग्णांची कोरोनावर मात

सलग सहाव्या दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या ५००वर गेली. मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत आज सार्वधिक, ४५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत १,३२,८६१ रुग्ण बरे झाले आहेत. यात शहरातील १,०६,५२९, तर ग्रामीणमधील २६,३३२ रुग्ण आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९२.८२ टक्के आहे.

-मागील आठवड्यात ४२०७ बाधितांची नोंद

मागील चार महिन्याच्या तुलनेत पहिल्यांदाच मागील आठवड्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ४२०७ नवे रुग्ण आढळून आले, तर त्यापुढील आठवड्यात, ७ ते १३ फेब्रुवारीदरम्यान २६६३ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्येत सरासरी दुप्पटीने वाढ झाली आहे. यामुळे मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आणि वारंवार सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

-दैनिक चाचण्या : ६३३५

-बाधित रुग्ण : १,४३,१३३

_-बरे झालेले : १,३२,८६१

- उपचार घेत असलेले रुग्ण : ५९९७

- मृत्यू : ४२७५

Web Title: Mayo, Medical Increased Corona Infections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.