मेयो, मेडिकलमध्ये वाढले पक्षाघाताचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:40 AM2020-01-04T00:40:41+5:302020-01-04T00:41:40+5:30

विदर्भात थंडीमध्ये वाढ होताच मेयो, मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. सकाळच्या वेळी येणाऱ्या या रुग्णांची संख्या मोठी आहे.

In Mayo, Medical Paralysis Patients Increased | मेयो, मेडिकलमध्ये वाढले पक्षाघाताचे रुग्ण

मेयो, मेडिकलमध्ये वाढले पक्षाघाताचे रुग्ण

Next
ठळक मुद्देरोज येत आहेत तीन-चार रुग्ण : ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार मिळणे कठीण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चौथे मोठे कारण ठरले आहे. विदर्भात थंडीमध्ये वाढ होताच मेयो, मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. सकाळच्या वेळी येणाऱ्या या रुग्णांची संख्या मोठी आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयात ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीच्या उपचाराची उणीव असल्याचेही समोर आले आहे.
शरीराच्या कोणत्याही अवयवाचे अचानक नियंत्रण जाणे याला पक्षाघात, ‘पॅरालिसीस’, लकवा किंवा ‘स्ट्रोक’ असे म्हणतात. मेंदूतील किंवा मज्जातंतूमधील पेशींनी अचानक काम करणे बंद केल्यामुळे हा आजार होतो. या आजाराबद्दल बहुसंख्य लोकांना अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अनेकांना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी, जन्मभर अपंगत्व किंवा रुग्ण मृत्यूलाही सामोरा जातो. तात्काळ उपचार घेतल्यास मृत्यू व अपंगत्व टाळता येते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) इतर दिवसात रोज एक-दोन पक्षाघाताचे रुग्ण येतात. अलिकडे थंडी वाढताच तीन-चार रुग्ण येत आहेत. डॉक्टरांच्या मते, थंडीमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या अखडतात. यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. हृदयावर ताण येऊन पक्षाघाताचा धोका निर्माण होतो. याला इतरही घटक कारणीभूत ठरतात. परिणामी,सकाळच्यावेळेत पक्षाघाताच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
‘गोल्डन अवर’चे नियोजनच नाही
पक्षाघाताची लक्षणे दिसताच चार ते पाच तासात उपचार मिळाल्यास या आजाराचे घातक परिणाम कमी करता येतात. यामुळे रुग्णाला ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे आवश्यक असते. परंतु चोर पावलांनी येणारा हा आजार रात्री झोपेत आल्यास सकाळी रुग्णालयात पोहचेपर्यंत बराच उशीर होतो. खासगी इस्पितळात या आजाराला घेऊन वेगळे ‘युनिट’ किंवा कार्यपद्धती असते. परंतु मेयो, मेडिकलमध्ये तसे नियोजन नसल्याचे चित्र आहे. विशेषत: रुग्णालयात आलेला रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभार्थी असेल तर त्याच्या उपचाराचा खर्च मंजूर व्हायलाच ४८ तासांचा वेळ लागतो. लाभार्थी रुग्ण नसेल तर तातडीने सिटी स्कॅन, चार तासाच्या आत दिले जाणारे सुमारे ४५ हजार रुपयांचे ‘टीपीए’ इंजेक्शन व इतरही उपचाराची सोय उपलब्ध असतेच असे नाही.

Web Title: In Mayo, Medical Paralysis Patients Increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.