मेयो, मेडिकलमध्ये अॅण्टीरेबिज लसच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 08:26 PM2018-08-03T20:26:51+5:302018-08-03T20:27:34+5:30
उपराजधानीत वर्षाकाठी सुमारे आठ ते नऊ हजार लोकांना श्वान चावतात. त्यांना रेबीजची बाधा होऊ नये म्हणून अॅण्टीरेबिज लस दिली जाते. मात्र, सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये महिन्याभरापासून ही लसच उपलब्ध नाही. दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसह इतरही रुग्णांना रिकामे परतावे लागते. महानगरपालिकेच्या दवाखान्यात ही लस उपलब्ध आहे. परंतु सुटीच्या दिवशी व रुग्णालयीन वेळेतच लस मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत वर्षाकाठी सुमारे आठ ते नऊ हजार लोकांना श्वान चावतात. त्यांना रेबीजची बाधा होऊ नये म्हणून अॅण्टीरेबिज लस दिली जाते. मात्र, सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये महिन्याभरापासून ही लसच उपलब्ध नाही. दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसह इतरही रुग्णांना रिकामे परतावे लागते. महानगरपालिकेच्या दवाखान्यात ही लस उपलब्ध आहे. परंतु सुटीच्या दिवशी व रुग्णालयीन वेळेतच लस मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.
श्वानदंशामुळे दरवर्षी साधारण २० हजार लोकांचा मृत्यू होतो. यात १५ वर्षे वयोगटाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. लस न टोचलेले कुत्रे मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो. विशेष म्हणजे, श्वान चावल्यानंतर देण्यात येणारी लसीची किंमत गरिबांना परवडणारी नाही. यातही केवळ ‘बीपीएल’च्या रुग्णांनाच ही लस उपलब्ध करून देण्याचे मेयो, मेडिकलचे धोरण आहे. परंतु गेल्या महिन्यापासून या दोन्ही रुग्णालयात अॅन्टीरेबिज लसच नाही. रुग्णांना बाहेर विकत आणण्यास किंवा महानगरपालिकेच्या दवाखाान्यात जाण्यास सांगितले जाते. गेल्या आठवड्यात एका महिलेला माकड चावल्याने ती मेडिकलमध्ये गेली, मात्र तिला खाली हात परतावे लागले.
महिन्याकाठी ५०० लसींची गरज
मेयो व मेडिकलमध्ये आठवड्याभरात सुमारे ७० ते ८० वर अॅन्टीरेबिज लसीची गरज भासते. महिन्याची सरासरी काढली तर मेडिकलला दरमहा ५०० अॅन्टीरेबिज लसी लागतात. ही लस ‘इंडियन इम्युनॉलॉजिकल’कडूनच मिळते. मात्र मागणीच्या तुलनेत फार कमी साठा पुरवठादाराकडून मिळतो. परिणामी, तुटवडा निर्माण होतो. यातच स्थानिक खरेदीवर मर्यादा आल्याने या दोन्ही रुग्णालयात लस नसल्याचे सांगण्यात येते.
‘हाफकिन’कडून लसीची प्रतीक्षा
वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या मेडिकलला औषधे पुरवठा करण्याची जबाबदारी ‘हाफकिन कार्पाेरेशन कंपनी’कडे देण्यात आली आहे. परंतु या कंपनीकडून अद्यापही अॅन्टीरेबिज लसीसह इतरही आवश्यक औषधे उपलब्ध न झाल्याने दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.
सुटीच्या दिवशी करावी लागते पदरमोड
लसीच्या तुटवडा पडल्याने कुत्रा, माकड किंवा मांजर चावलेल्यांना महापालिकेच्या इस्पितळांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. मनपाच्या सदर आणि महाल येथील इस्पितळांमध्ये अॅण्टीरेबीजची लस आहे. परंतु रविवार व इतर सुटींच्या दिवशी हे दोन्ही इस्पितळे बंद राहत असल्याने रुग्णांची बोळवण होते. इतर दिवशीही ठराविक वेळेतच ही लस मिळते. यामुळे गरिबांनी करावे काय, हा प्रश्न पडला आहे.