मेयो, मेडिकलमध्ये बदलीची टांगती तलवार

By admin | Published: May 28, 2017 02:28 AM2017-05-28T02:28:07+5:302017-05-28T02:28:07+5:30

ज्या वरिष्ठ डॉक्टरांना एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त वर्षे झालीत, ज्यांनी विद्यार्थ्यांचे कमी वर्ग घेतले,

Mayo, Medical Transition Sword | मेयो, मेडिकलमध्ये बदलीची टांगती तलवार

मेयो, मेडिकलमध्ये बदलीची टांगती तलवार

Next

‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील मेसेजने वाढविला ‘बीपी’ : रुग्णसेवेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर येणार संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या वरिष्ठ डॉक्टरांना एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त वर्षे झालीत, ज्यांनी विद्यार्थ्यांचे कमी वर्ग घेतले, रुग्णसेवेकडे दुर्लक्ष केले व रुग्णांच्या तक्रारी असतील अशा डॉक्टरांची नावे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) सहसंचालकांकडे पाठवा, ‘व्हॉटसअ‍ॅप’वरील या मेसेजमुळे मेयो, मेडिकलमध्ये पुन्हा एकदा बदलीचे वारे सुरू झाले आहे. सूत्रानुसार, मेडिकलच्या सहा तर मेयोच्या पाच डॉक्टरांची नावे सचिवांकडे गेल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, मेयो, मेडिकलच्या एकाच ठिकाणी गेल्या १५ वर्षे कायम असलेल्या सहयोगी प्राध्यापकांच्या बदल्यांच्या पत्राला घेऊन नुकतेच दोन्ही रुग्णालयाचे वातावरण तापले होते. यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करीत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी थेट संवाद साधला. यामुळे बदल्या रद्द झाल्याचे बोलले जात होते, परंतु आता ‘डीएमईआर’चे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांच्या नावाचे ‘मेसेज’ अधिष्ठात्यांच्या मोबाईलवरून अनेकांच्या ‘वॉटसअ‍ॅप’वर गेल्याने खळबळ माजली आहे.
नियमानुसार शासकीय नोकरीत तीन वर्षे पूर्ण झालेल्या तसेच ३० टक्क्यांच्या मर्यादेत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा नियम आहे. मात्र, अनेकदा बदली झाल्यानंतर संबंधित अधिकारी वैयक्तिक कारणास्तव अथवा जिल्ह्याच्या बाहेर पदस्थापना स्वीकारण्यास तयार होत नाही. प्रसंगी अनेकजण स्वेच्छानिवृत्तीचाही मार्ग निवडतात.
तर काही जण न्यायालयाचे दार ठोठावतात. परिणामी, दरवेळी सरकारला कोणत्या ना कोणत्या करणाला घेऊन नामुष्कीला सामोरे जावे लागते. यातच मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) निकषात अपात्र ठरणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थी संख्याही धोक्यात येते. रुग्णहितातही बाधा निर्माण होते. विशेष म्हणजे, एमसीआयने शासकीय मेडिकल कॉलेजच्या पदव्युत्तर शिक्षकांची बदली झाल्यास बदलीच्या ठिकाणी तीन वर्षे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविता येणार नाही, असे परिपत्रक काढले.
यामुळे गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही बदल्या होणार नाही, अशी अनेकांची धारणा होती. परंतु या ‘वॉटस अ‍ॅप’मुळे बदली निश्चित असल्याचे बोलले जात आहे. सूत्रानुसार, मेडिकलच्या सहा तर मेयोच्या पाच डॉक्टरांची नावे सचिवांकडे गेली आहे. परंतु वैद्यकीय शिक्षणमंत्री यावर काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mayo, Medical Transition Sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.